Posts

Showing posts from July, 2019

कडाक्याची थंडी (कविता)

Image
कडाक्याची थंडी कडाक्याची थंडी सवे पेटती चूल तुझ्या रुपाची सखे मज पडली भूल. कडाक्याची थंडी हवे गोधळी पांघरूण खाटेवरी पडलं तुझ्या रुपाचं चांदणं. कडाक्याची थंडी मळा फुलला जोमात तुझ्या संगतीने सखे जोश वाहतो रोमात कडाक्याची थंडी तू उबदार दुलई या उघड्या राती वाजे प्रेमाची सनई या उघड्या राती..... 👤 अरुण व्ही. लाडे

सत्गुण विकणे आहे

Image
सत्गूण विकणे आहे आफ सिजन वाढवा वजन पिक आले बंडी भर रुपयाले दिले खंडीभर त्वरा करा घाई करा शिंप्याला नाई करा जास्ती का माल सस्ते मे हासती काहेकू रस्ते मे आमच्याकडे अगदी किफायतीत सत्गूण विकणे आहे भाऊ मार्केटला सार्टेज चालला फक्त तुमच्यासाठी सस्ता लावला त्वरा करा घाई करा शिंप्याला नाई करा.... सत्गूण....सत्गूण घ्या....घ्या... चला, या..... सत्गूण. 👤  अरुण व्ही. लाडे

कविताः आपल्या मनातील स्थान व महत्व (भाग ३ कवी ग्रेस यांची कविता)

Image
              कवी ग्रेस म्हणजे निर्जन स्थळी धुक्यात हरवलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले गूढ घर. त्याच्या जेवढे जवळ जाल तेवढे अधिक सौंदर्य नजरेस पडणारे, असे हे ठिकाण. ज्यांचे वयक्तिक आणि साहित्यिक हे दोन्ही अंग गुढतेने व्यापलेले होते, ते कवी ग्रेस आम्हा अभ्यासकांसाठी औत्सुक्याचा विषय होते. अनेकार्थाने बंधिस्त असलेल्या कवितेला एका निश्चित अर्थापाशी नेणे अनेक अभ्यासक, समिक्षकांनाही जमलेले नाही. म्हणून आजही कवी ग्रेस तेवढेच गूढ वाटतात . त्यांच्या नावापासूनच हे वेगळे काही तरी रसायन आहे याची जाणीव होते. पहिल्या नजरेत प्रेमात पाडणाऱ्या त्यांच्या कविता हे सिध्दही करतात.               कवी ग्रेस यांची पहिल्यांदा ओळख झाली ती एम. ए. ला असताना. त्यांचे कवितासंग्रह अभ्यासक्रमात होते. आमच्या सरांनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून ग्रेसची ओळख करून दिली. त्यांच्या कवितांत अदृश्य ठसणीपणा जाणवला. त्यांच्या अवलिया जगण्यातून तो आला असावा. कवितेच्या पार्श्वभूमीला एक अनामिक वेदनेचे वातावरण असते जे वाचकांशी थेट नाते सांगणारे आहे....

गोड भजींच्या निमित्ताने...!

Image
             आज माझ्या आईची खूप आठवण येत आहे. मोकळा वेळ आणि लहान मुलाचा लागलेला तगादा, पप्पा भजी बनवा भजी बनवा, शेवटी भजी बनवायला पिट भिजायला घातला आणि आईची आठवण झाली. आई भजी कशी बनवायची तेही आठवले. गव्हाचे पीठ, त्यात चवी पुरते मीठ, साखर आणि खोबऱ्याचे (डोल) बारीक तुकडे मिसळून पाणी टाकायचे. हे सर्व एकजीव करायचे. हे लहानपणापासून तरुणपणापर्यंत बघत होतो. आई दरवर्षी पोळा व दिवाळीच्या सणाला गोड भजी करायचीच. सोबतीला लाखीच्या डाळीचे वडे. वर्षातून फक्त दोनदा असे तेलात तळलेले पदार्थ खायला मिळायचे. आम्ही सारे भाऊ या दिवसाची आतूरतेने वाट पाहत असू. आई चूल पेटवून, तीवर कढई मांडायची. कढईत पीठाचे मिश्रण सोडण्याआधी तेलात बिबा टाकायची. बीबा तसा भयानक फळ. कारण त्याचे रस अंगाला लागले तर फोडे येतात. त्यामुळे त्यापासून लांबच राहायचो. पण तेलात सोडलेला बीबा धोकादायक नसायचा. त्याची बी रुचकर. भजी करून झाल्यानंतर तळलेला बीबा फोडून आम्ही खायचो. आज हे सर्व चित्र भजी करताना डोळ्यापुढे उभे झालेत.               ताटात येणारे अन्न पोट भरेपर्यंत ...

कविताः आपल्या मनातील स्थान व महत्व (भाग २ गारवामधील कविता)

Image
गारवा - एक अवीट अनुभव             गारवा हा मराठी व हिंदी गीतांचा (मराठीतील भूतपूर्व  यश बघून Rajashri Music ने हिन्दी अल्बम तयार केला.) अल्बम फार गाजला होता. ते वाकमनचे दिवस होते. अनेक काॕलेज तरुणांच्या कानात वाकमनचा ईअरफोन लावला असायचा. आणि बहुतेक गाणी गारवा या अल्बममधली असायची. १९९५ च्या काळात आलेले हे अल्बम तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरले होते. आजच्या तुलनेत प्रेम हे सहज फुलणारे भावविश्व आहे, (अपवाद सर्व काळात असतातच, ते सोडून) असे मानणाऱ्यांचा तो काळ होता. हे भावविश्व गारवात कवीने अलगद चितारले आहे. कवी सौमित्र यांच्या मुक्तछंदातल्या कविता प्रेमाचा वेगळा जग उभे करायच्या. अशीच एक कविता आहे... बघ माझी आठवण येते का ? मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलसं तळं पिऊन टाक बघ माझी आठवण येते का? वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे डोळे मिटून घे, तल्लीन हो नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा वाळू सरकेल पायाखाली, बघ...

तो....

Image
तो ये म्हटल्याने येत नाही जा म्हटल्याने जात नाही आपल्या मर्जीचा मालक तो तुम्ही म्हणाल तसे वागत नाही अखंड तो बरसतो बरसत राहतो पूर येईपर्यंत कधी तो फिरकत नाही पिकाला आणि घशालाही कोरड पडेपर्यंत.... भेगा पडल्या भुईला वणवणत्या आईला तहानलेला सोडून तो लपून बसतो अगदी मुर्दाळ मुला सारखा..... तो ढुंकुनही पाहत नाही तुमचे तलाव, नदी, नाले आणि विहिरी बिस्लेरीच्या बाटलीत तो आता बंद आहे. काय सांगू माझ्या मुलाला पाऊस का पडत नाही तो शोधतो पुस्तकात म्हणतो, पापा तुम्ही कधी झाड तोडले का ? माझ्या डोळ्यातील अपराधी भाव बघून त्याच्या डोळ्यात पाऊस दाठतो आज मुलगा रुसलाय आणि पाऊसही.... झळ झाली पाहुणी ती येते अन् जाते भेगाडल्या भुईमध्ये आसुसले गवताचे पाते धावती भेट घेतो न सांगताच तो निघून जातो परगावी गेलेल्या मुलाची दारात वाट पाहणारी म्हातारी आता पावसाचीही वाट पाहते. मुलगा येत नाही आणि पाऊसही....                              👤  अरुण व्ही. लाडे                ...

'स्व'पन

Image
द्रोपदीची लाज राखायला तेव्हा कृष्ण धावला होता तुझ्या नग्नतेचे धिंडवडे निघताना त्या दुशासनास शिक्षा द्यायला आज कोणता कृष्ण येणार नाही. तुच... तुच सबल होशील तर तुझे ' स्व'पन वाचवू शकशील अन्यथा अजून एका अमृताचा          ( pic credit- online) बळी जाणार तुझ्या रुपात.                                                अरुण व्ही. लाडे

तू रोज येतेस.....

Image
तू रोज येतेस पायरीवर फुले ठेवतेस मंदिरात न जाता घरी परत जातेस तू एकदाचे सांगून टाक ही फुले कोणासाठी आहेत ते ?                      अरुण व्ही. लाडे 

वाचन व अभिरुची यांचा सहसंबंध

Image
             वाचन हे माणसाला अनुभवसमृध्द करते हे स्विकारलेच पाहिजे. ज्या बाबींचा दुरान्वयाने संबंध नाही त्यांच्याशी जोडण्याचे काम वाचन करते. वाचन आणि शास्त्र             आपल्यातील सगळेच पट्टीचे वाचक नसतात. काहींना वाचायला आवडते काहींना नाही. यामागे काही शास्त्रीय कारण असू शकेल, हे अनेकांच्या गावीही नसते. अर्थात ही जीवशास्त्रीय बाब आहे. वाचनाशी शास्त्रीय संबंध आहे, याचा विचारच केला जात नाही. यावर संशोधनही झाले आहे. काळानुसार वाचनाची आवड व माध्यमेही बदलले आहेत. असे असले तरी वाचन हे सर्वांच्या आवडीचे प्रकार आहे, असे म्हणता येत नाही. यासंदर्भात दै. लोकसत्तामध्ये लेख प्रकाशित झाला होता. पंकज भोसले लिहितात, " एका वर्षाच्या कालावधीत तुम्ही किती पुस्तके वाचता, याचा हिशेब ठेवायला गेलात तर वाचू शकलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक न वाचू शकलेल्या ग्रंथांची यादी वाढत गेलेली पाहायला मिळते. पट्टीचा वाचक, पुस्तककीडा, बिब्लोफाइल, ग्रंथोपासक, वाचनोत्सुक या संकल्पना व्हाट्सॲप युगातील एकाग्रशून्यतेमुळे लोप पावत चालल्या आहेत. बिनीच्या वा...

चारोळी

मी असाच आहे असाच राहीन अश्रूंसवे अश्रू मी वाहीन... झाले ना कुणी माझे तरी साऱ्यांचा मी होऊन जाईन.... ***** शब्दांकडे पाहू नकोस आज बोल तू मनातले.... डोळ्यातल्या सावल्याना झाड दाखव ऊनातले.. ..                     अरुण व्ही. लाडे

तू ये बरसात होऊन

Image
तू ये बरसात होऊन माझ्या बंजर झालेल्या जमीनीत ओत पहिल्या नजरेचं पाणी आणि उगव प्रितीचं फूल. भेगाळलेल्या भावनांवर हळूच फिरव तुझा हात, तुझ्या आपुलकीचा निचरा होऊ दे माझ्या अंतर्मनात. सखे, तू बरसात होऊन ये आणि माझ्या आयुष्याचा कोपरा न् कोपरा चिंब करुन टाक....                    👤अरुण व्ही. लाडे                       दि. १३/०६/२०१७

कविताः आपल्या मनातील स्थान व महत्व (भाग १ कवी सुरेश भटांची कविता)

Image
कवी सुरेश भटांची कविता               कविता हे अनेक प्रकाराने विस्तारलेले व्यापक असे साहित्य आहे. त्यात ओवी, अभंग, गझल, पोवाडा, भारुड असे अनेक काव्य प्रकारांचा अंतर्भाव होतो. अनेक थोर साहित्यिकांनी आपल्या लेखनाची सुरुवात कवितेनेच केली आहे. कविता ही सर्वांच्याच जवळची आहे.               मराठी साहित्यक्षेत्रातील गझल या काव्य प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली ती कवी सुरेश भट यांनी. यांच्या गझलांकडे बघूनच अनेक नव कवींनी गझल लिहू लागले. एवढा प्रभाव त्यांचा होता. त्यांच्या अनेक सुंदर गझलांपैकी पुढील गझल पहा - "जगत मी आलो असा" जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही! एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही! जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे; सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही! कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो; पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही! सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी; एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही! स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे; एवढे स्मर...

चारोळी....

आपल्याच सावलीला सोडून जातोस कसा तू भुतांच्या दावनीला मला बांधतोस कसा तू... ++++ माझेच मला कधी गावले नाही वितभर प्रेतांच्या टाळुंवरची ते लोणी खाती रितसर.... ++++ खंत नको ती क्षणाचीही उसंत नको रोजच्या मरणाला जीवनाचे रवंथ नको... ++++ नको चांदने नको तारका नकोत मजला रात काजवे तू असशी दूर जरीही भास तुझे ही रात्र जागवे. ++++ आम्ही कधीच केली नाही पर्वा जीवापासून तिच्यावर प्रेम केले घातकीच ठरली साथ तिची तिने काळजावर वार खोल केले.                    👤  अरुण व्ही. लाडे  

लग्नमुहूर्त आणि तापमान वाढ

Image
                    लग्न मुहूर्त आणि तापमान वाढ                  लग्न....! सर्वांच्याच(काही अपवाद सोडून) आयुष्यातील महत्वाची घटना. आपण भारतीयांमध्ये तर विवाहसंस्थेला जन्मोजन्मीचं बंधन वगैरेही मानतात. ज्या घरी लग्न ठरलेला असतो, त्यांच्यासाठीच नव्हे तर मित्र मंडळी, नातेवाईकांसाठीही आनंदाची पर्वणी असते. ग्रामीण भागात तर संपूर्ण गावाला हा सोहळा आपल्या घरचाच वाटतो. पूर्वी बैलगाड्यांनी वऱ्हात निघायची. हा प्रवास मजेदार असायचा. बैलगाड्यांची लांबच लांब रांग बघून प्रवासातील रस्त्यातल्या गावकऱ्यांमध्ये कुजबूज चालायची, "बडी असामी दिसतेय." विचारपूस व्हायची. पाणी पाजायचे, काहीजण तर चहाही. जर पुढून एखादी दुसरी वऱ्हात आली तर दोन्ही नवरदेव एकमेकांना सुपारी देत असत. (जणू ते एकमेकांना सांगत असावेत, की आपण सुपारी आणि बायको आडकीत्ता. हा गंमतीचा भाग सोडा, पण असे चांगले रीवाज आज लयास जात आहेत.) अशा हर्षोउल्हासात वऱ्हातीचं वधू गावी आगमन व्हायचं. जाणवसा असलेल्या घरून चिवडा वगैरे (बहुतेक चिवडाच असायचा) खावून सोबत आ...

काळोख अन् दिपस्तंभ

Image
काळोख अन् दिपस्तंभ घुसमटलेल्या रात्रीचे पांघरूण पार फेकून द्यावे रात्रीच्याच पोकळीत सूर्याला जागवून आकाशाला जवळ करत भटकून यावे दूर क्षितिजापर्यंत. करकच्च मिठीत अंधार आवळून ठेवतो रात्रीच्या खाटेवर अंधारपाश तोडून मिणमिणत्या उजेडाला साद घालत पसरावे अंतर्बाह्य. काळोखाच्या गुहेत आंधळा प्रवास ऊर फोडणारा उजेडाचे सारेच दारं बंद होताना मेंदूचा भव्य समुद्र सांगतो, काजव्याचाही क्षुद्र टिंब दिपस्तंभ होऊन जातो काठ गाठायला. अंधाराशी पैज लावावी अन् उजेडाने आपले घोडे दामटावे पार उधळून टाकावे अंधारगर्व त्यास दाखवावा आरसा तो स्वतःच गळून पळेल पिकल्या पानासारखा कायमचा....                    👤 अरुण व्ही. लाडे                        दि . २४ मे २०१९ 

पंचनामा

Image
पंचनामा उजाडलेल्या झाडावरती थवा पक्षांचा बसावा झाडाची फांदीन् फांदी तेव्हा मोहरुन यावी आनंदाने अन् त्या निष्पर्ण फांदीलाही फुटावा मायेचा ओलावा तसंच..., दूरवरुन सरकारी अधिकाऱ्याला येताना बघून पारावर बसलेला शेतकरी तरारुन उठतो या मरत्या पिकाचा होणार आता पंचनामा अन् मिळेल भरपाई म्हणून सरकारी अधिकारी त्या पक्षासारखा भासतो. वाळक्या फांदीला पालवी फुटावी तसं झाड हिरवाकंच होतो त्याच्या डोळ्यात. पंचनामा होतो पिकाचा, शेतकऱ्याच्या आशेचा मग कागदाच्या चार ओळीत तो पडून राहतो पुढचा पिक येईपर्यंत..... शेतकरी आता आपल्याच मरणाच्या पंचनाम्याची वाट बघतोय दूरवर त्याची नजर शोधत असते एका सरकारी अधिकाऱ्याला..... एका सरकारी अधिकाऱ्याला.....                             अरुण व्ही. लाडे