तो....
तो ये म्हटल्याने येत नाही
जा म्हटल्याने जात नाही
आपल्या मर्जीचा मालक तो
तुम्ही म्हणाल तसे वागत नाही
अखंड तो बरसतो
बरसत राहतो पूर येईपर्यंत
कधी तो फिरकत नाही
पिकाला आणि घशालाही
कोरड पडेपर्यंत....
भेगा पडल्या भुईला
वणवणत्या आईला
तहानलेला सोडून
तो लपून बसतो
अगदी मुर्दाळ मुला सारखा.....
तो ढुंकुनही पाहत नाही
तुमचे तलाव, नदी, नाले आणि विहिरी
बिस्लेरीच्या बाटलीत तो आता बंद आहे.
काय सांगू माझ्या मुलाला
पाऊस का पडत नाही
तो शोधतो पुस्तकात
म्हणतो, पापा तुम्ही कधी झाड तोडले का ?
माझ्या डोळ्यातील अपराधी भाव बघून
त्याच्या डोळ्यात पाऊस दाठतो
आज मुलगा रुसलाय आणि पाऊसही....
झळ झाली पाहुणी
ती येते अन् जाते
भेगाडल्या भुईमध्ये
आसुसले गवताचे पाते
धावती भेट घेतो
न सांगताच
तो निघून जातो
परगावी गेलेल्या मुलाची
दारात वाट पाहणारी म्हातारी
आता पावसाचीही वाट पाहते.
मुलगा येत नाही
आणि पाऊसही....
👤 अरुण व्ही. लाडे
Comments
Post a Comment