गोड भजींच्या निमित्ताने...!
आज माझ्या आईची खूप आठवण येत आहे. मोकळा वेळ आणि लहान मुलाचा लागलेला तगादा, पप्पा भजी बनवा भजी बनवा, शेवटी भजी बनवायला पिट भिजायला घातला आणि आईची आठवण झाली. आई भजी कशी बनवायची तेही आठवले. गव्हाचे पीठ, त्यात चवी पुरते मीठ, साखर आणि खोबऱ्याचे (डोल) बारीक तुकडे मिसळून पाणी टाकायचे. हे सर्व एकजीव करायचे. हे लहानपणापासून तरुणपणापर्यंत बघत होतो. आई दरवर्षी पोळा व दिवाळीच्या सणाला गोड भजी करायचीच. सोबतीला लाखीच्या डाळीचे वडे. वर्षातून फक्त दोनदा असे तेलात तळलेले पदार्थ खायला मिळायचे. आम्ही सारे भाऊ या दिवसाची आतूरतेने वाट पाहत असू. आई चूल पेटवून, तीवर कढई मांडायची. कढईत पीठाचे मिश्रण सोडण्याआधी तेलात बिबा टाकायची. बीबा तसा भयानक फळ. कारण त्याचे रस अंगाला लागले तर फोडे येतात. त्यामुळे त्यापासून लांबच राहायचो. पण तेलात सोडलेला बीबा धोकादायक नसायचा. त्याची बी रुचकर. भजी करून झाल्यानंतर तळलेला बीबा फोडून आम्ही खायचो. आज हे सर्व चित्र भजी करताना डोळ्यापुढे उभे झालेत.
ताटात येणारे अन्न पोट भरेपर्यंत ढकलायचे अगदी आनंदाने, हे आमच्या जेवनाचे साधे नियम होते. जेवनात भाजी म्हणून बहुतेकवेळी लाखोळीची डाळ (वरण) असायची. कारण शेतात तिचा मुक्त वावर. कमी खर्चात तिचे पिक होई. आमच्या जेवणातील तीच मुख्य घटक होती. हल्ली लाखोळीचे प्रमाण फार कमी झालेले दिसते. ठरलेल्या, मोजक्या भाज्या होत्या. विविधता नसलेल्या जेवनात असा गोड बेत असल्यावर आनंदाला उधान येत असे. आयुष्य कलरफुल वाटायचे.
painting by - Amrita Sher-gil
दारिद्रयाचे चटके वगैरे शब्द गरीबीविषयी वापरतात. हे प्रत्यक्ष आम्ही भोगले आहे. आज इच्छा झाली की कुठलेही पदार्थ घरी बनवून वा घेऊन खाऊ शकतो. मात्र आईच्या हातचे भजी आज कुठेही मिळणार नाही. मग आई जशी बनवायची तसेच बनवण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या मुलांनाही हे काहीतरी नवीन प्रकार वाटतात. ते आवडीने खातात. पत्नीच्या व माझी कौटुंबिक परिस्थितीत साम्य नसल्याने त्यांचा आहार वेगळा होता. त्यामुळे तीलाही यांचा अप्रुपच. गावखेड्यातील गरीबांचे पदार्थ मोजकेच. तेच दरवर्षी एखाद्या निमित्ताने केली जातात. आमच्या गावाकडे पावसाळ्यात 'लोऱ्या' हा प्रकार केला जायचा. गरीबांचे ते गुलाबजामून. आमची आईही ते बनवायची. गव्हाचे पीठ भिजवून त्याच्या गोलाकार लांब चकत्या करायच्या, एकेक इंचीचे तुकडे करायचे. साखरीच्या पाण्यात शिजवायचे. बस्स, खा गरम गरम. उरलेले सकाळी आवडीने खात असू. आमच्याकडे अन्न फेकने हा प्रकार नव्हताच. रात्रीचे सकाळी, सकाळचे रात्री हे नेहमीच चालायचे. याचा परिणाम आज अन्नाविषयी आदर टिकून आहे. जेवढे हवे तेवढेच बनवायचे, असा दंडक पाळला जातो. मी एखाद्यावेळी ह्या लोऱ्या घरी बनवतो. गावाकडील आठवणींचा कोलाज या सगळ्यांभोवती चिकटून आहे.
पोळा, दिवाळी अशा सणांच्या दिवशी आई आंगणात दोनदा सळा टाकायची. सकाळी आणि सांयकाळी. संपूर्ण घर झाडून लाल मातीने सारवून घेई. सणाच्या दिवशी आईचे रुप मला अलौकिक भासे. आंघोळ करुन ती मोकळे केस वाळवत फणीने विंचरून केसांचा जुडा बांधली की ती मला एखाद्या परीसारखी वाटत असे. आंघोळीनंतर आई अंगणात मध्यभागी शेणाचा मोठा गोलाकार गोळा ठेवून त्यावर जास्वंदाचे फूल ठेवायची. शेणावर पीठाच्या चार पाच रेघोट्या. अंगण आणि घर सणासाठी तयार. आईची लगबग आज लक्षात येते. तेव्हा मात्र माझी तिला मदत झाली नाही, ही खंत आहे. ती सण गोड करण्याच्या तयारीत लागलेली. चुलीवरच्या विस्तवाची धग तिच्या उत्साहापुढे गार वायची. आईच्या हातच्या गोड भज्याने आमचे सगळे सण गोड होऊन जात.
आईच्या मृत्यूनंतर गावाची ओढ कमी झाली असली तरी गाव तर कायम सोबत असतोच. तेथील लोकं, शेती, गरीबीचे दिवस, आई-बाबांचे कष्ट हे सगळे माझ्या अवती भवती नजर रोखून असतात. दारिद्रयातील दिवस घालवत असताना सणवाराच्या निमित्ताने गोडधोड झाले की, जगण्याची श्रीमंती वाढायची. आज श्रीमंती( ?)( कर्जाऊ ) असली तरी तो गोडवा नाही. अशावेळी सगळे काही असूनही पोरकेपणाची जाणीव बळावते. मग मी पुन्हा एकदा गोड भजी करायला पीठ भिजवतो.
👤 अरुण व्ही. लाडे
Comments
Post a Comment