कविताः आपल्या मनातील स्थान व महत्व (भाग २ गारवामधील कविता)

गारवा - एक अवीट अनुभव

            गारवा हा मराठी व हिंदी गीतांचा (मराठीतील भूतपूर्व  यश बघून Rajashri Music ने हिन्दी अल्बम तयार केला.) अल्बम फार गाजला होता. ते वाकमनचे दिवस होते. अनेक काॕलेज तरुणांच्या कानात वाकमनचा ईअरफोन लावला असायचा. आणि बहुतेक गाणी गारवा या अल्बममधली असायची. १९९५ च्या काळात आलेले हे अल्बम तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरले होते. आजच्या तुलनेत प्रेम हे सहज फुलणारे भावविश्व आहे, (अपवाद सर्व काळात असतातच, ते सोडून) असे मानणाऱ्यांचा तो काळ होता. हे भावविश्व गारवात कवीने अलगद चितारले आहे. कवी सौमित्र यांच्या मुक्तछंदातल्या कविता प्रेमाचा वेगळा जग उभे करायच्या. अशीच एक कविता आहे...

बघ माझी आठवण येते का ?

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी, बघ माझी आठवण येते का ?


             गारवामधील कविता आणि सुरेल गीतांचा तत्कालीन तरुणाईवर जादूगत प्रभाव होता. या अल्बममधील कविता आणि गीत डोळ्यापुढे प्रेमाची बाग फुलवत असत. या अल्बममध्ये प्रेमाची हळूवार भावना कविता व संगीताच्या संगमातून अप्रतिम व्यक्त झाली आहे.

गारवा वाऱ्यावर भीर भीर पारवा,
नवा नवा, प्रिये तुझा जसा गोडवा....


           संगीत आणि शब्दांचं मेळ जुळून आला तर "गारवा" सारखी कलाकृती तयार होते. कवी सौमित्र यांच्या गीतांना मिलिंद इंगळे यांनी अप्रतिम साज चढवला. कवी जर अभिनेता असला तर कवितांना अधिक नाट्यमयता लाभते. गारवात ती आहे. सौमित्र उर्फ किशोर कदम हे उत्तम अभिनेते असल्याने कवीता सादरीकरणाची आगळी वेगळी शैली रसिकांना अनुभवायला मिळते. गारवातील कविता, संगीत आजही मनाला ओलेचिंब करतात.
                                                    👤 अरुण व्ही. लाडे

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....