कविताः आपल्या मनातील स्थान व महत्व (भाग ३ कवी ग्रेस यांची कविता)
कवी ग्रेस म्हणजे निर्जन स्थळी धुक्यात हरवलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले गूढ घर. त्याच्या जेवढे जवळ जाल तेवढे अधिक सौंदर्य नजरेस पडणारे, असे हे ठिकाण. ज्यांचे वयक्तिक आणि साहित्यिक हे दोन्ही अंग गुढतेने व्यापलेले होते, ते कवी ग्रेस आम्हा अभ्यासकांसाठी औत्सुक्याचा विषय होते. अनेकार्थाने बंधिस्त असलेल्या कवितेला एका निश्चित अर्थापाशी नेणे अनेक अभ्यासक, समिक्षकांनाही जमलेले नाही. म्हणून आजही कवी ग्रेस तेवढेच गूढ वाटतात. त्यांच्या नावापासूनच हे वेगळे काही तरी रसायन आहे याची जाणीव होते. पहिल्या नजरेत प्रेमात पाडणाऱ्या त्यांच्या कविता हे सिध्दही करतात.
कवी ग्रेस यांची पहिल्यांदा ओळख झाली ती एम. ए. ला असताना. त्यांचे कवितासंग्रह अभ्यासक्रमात होते. आमच्या सरांनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून ग्रेसची ओळख करून दिली. त्यांच्या कवितांत अदृश्य ठसणीपणा जाणवला. त्यांच्या अवलिया जगण्यातून तो आला असावा. कवितेच्या पार्श्वभूमीला एक अनामिक वेदनेचे वातावरण असते जे वाचकांशी थेट नाते सांगणारे आहे. एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ग्रेसांच्या कविता मनात आनंदाची पेरणी करतात. त्यांचे कवितासंग्रह पुढीलप्रमाणे आहेत-
१)बाई! जोगिया पुरुष,
२)राजपुत्र आणि डार्लिंग,
३)संध्याकाळच्या कविता,
४)सांजभयाच्या साजणी
५)सांध्यपर्वातील वैष्णवी
त्यांच्या काव्याचे वेगळेपण त्यांच्या कवितासंग्रहाच्या नावांवरूनही लक्षात येईल. कवी ग्रेसांच्या कवितेचे सायंकाळाशी घट्ट संबंध आहेत. सांजवेळ....दिवस कलता कलता मनाला हूरहूर लावणारी वेळ. यावेळी हळुवार भावनांदोलन नभाला साद घालते. ग्रेस यांच्या कवितेत ही भावनातूरता नादमयरीत्या अवतरली आहे. ही हूरहूर कोणाची आहे हे मात्र निश्चित सांगता येत नाही. आई, प्रेमिका, पत्नी, खूप जवळची कोणीतरी व्यक्ती असे अनेक अंदाज बांधून कवितेच्या भावविश्वाच्या पार्श्वभूमीसंबंधी विचार करावा लागतो.
ग्रेस यांची कविता मला जी फार आवडते ती ही -
पाऊस कधीचा पडतो
झाडाची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद स्वराने.
डोळ्यांत उतरते पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती.
पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला.
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्या किनाऱ्यावरती
लाटांचा आज पहारा.
आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीच्या दुःखात जी मनोवस्था होते, ती या कवितेतून प्रगट झाली आहे. दुःख हे सार्वकालिक आहे. दुःखाचेही एक विशिष्ट दृश्यरुप असते. ते दृश्य ग्रेस अलगदपणे टिपतात. पाऊस, संध्याकाळ, अंधार हे दुःख व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक घटक, कवी ग्रेसांच्या कवितेत उत्कटतेने झिरपले आहेत. एकजीव झाले आहेत. दुःख हे व्यक्तीला एकाकी करते. तशी जाणीव होते. दुःखाच्या मंद स्वराने कवीची झोप उडते. आठवणींच्या काठाला डोळ्यातील आसवं धडका देतात.
ग्रेस यांची ही खालील कविता सुप्रसिद्धच आहे,
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकवीली गीते
तो झरे चंद्रसजणाचे ती धरती भगवी माया
झाडांत आपण निजलो झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
त्यांची कविता दुर्बोध असल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. यासंदर्भात "मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही" असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या कवितांच्या माध्यमातून मी मराठी साहित्याला बरेच काही दिले आहे, असेही ते स्पष्ट बोलून जातात. अनेकजनांना ग्रेसची कविता दुर्बोध वाटते हे खरे असले तरी दुर्बोधता हेच त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य झाले.
कवी ग्रेस यांच्या अनेक कवितांपैकी खालील कविता पाऊस आणि दुःखाचे सहसंबंध जोडणारी कविता आहे. आईच्या मृत्यूचे दुःख या कवितेत व्यक्त झाले आहे.
ती गेली तेव्हा रीमझीम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता.
ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धूरकट तेव्हा कंदील एकटा होता.
कवितेच्या बंधाला विविध भावनांचे धागे जुळले असतात. तेच धागे वाचकांना कवितेशी बांधून ठेवतात. शब्द आणि भावना सुरेखरीत्या जुळून आले तर ते काव्य वाचकांच्या हृद् यात स्थान निर्माण करू शकते. कवी ग्रेस यांच्या बहुतेक कवितांनी तसे स्थान निर्माण केले आहे. अखिल मराठी साहित्यविश्वातील काव्य प्रकारात त्यांच्या कविता ठळकपणे नजरेस भरतील अशा आहेत.
👤 अरुण व्ही. लाडे

Comments
Post a Comment