वाचन व अभिरुची यांचा सहसंबंध
वाचन हे माणसाला अनुभवसमृध्द करते हे स्विकारलेच पाहिजे. ज्या बाबींचा दुरान्वयाने संबंध नाही त्यांच्याशी जोडण्याचे काम वाचन करते.
वाचन आणि शास्त्र
आपल्यातील सगळेच पट्टीचे वाचक नसतात. काहींना वाचायला आवडते काहींना नाही. यामागे काही शास्त्रीय कारण असू शकेल, हे अनेकांच्या गावीही नसते. अर्थात ही जीवशास्त्रीय बाब आहे. वाचनाशी शास्त्रीय संबंध आहे, याचा विचारच केला जात नाही. यावर संशोधनही झाले आहे. काळानुसार वाचनाची आवड व माध्यमेही बदलले आहेत. असे असले तरी वाचन हे सर्वांच्या आवडीचे प्रकार आहे, असे म्हणता येत नाही. यासंदर्भात दै. लोकसत्तामध्ये लेख प्रकाशित झाला होता. पंकज भोसले लिहितात, "एका वर्षाच्या कालावधीत तुम्ही किती पुस्तके वाचता, याचा हिशेब ठेवायला गेलात तर वाचू शकलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक न वाचू शकलेल्या ग्रंथांची यादी वाढत गेलेली पाहायला मिळते. पट्टीचा वाचक, पुस्तककीडा, बिब्लोफाइल, ग्रंथोपासक, वाचनोत्सुक या संकल्पना व्हाट्सॲप युगातील एकाग्रशून्यतेमुळे लोप पावत चालल्या आहेत. बिनीच्या वाचकसमूहाचेही मोबाइल, टॕब यांवर वाचन सुरू आहे, पण शुध्द साहित्यिक वाचनाला हवी तितकी निवांतता देता येत नाही." शेवटी वाचनाचे परंपरागत साधनच खरा वाचनानंद देते हेच खरे.
वाचन हे मानसिक पातळीवरील क्रिया आहे. यानुसार आपण कमी अधिक प्रमाणात वाचनाचा आनंद घेत असतो. हे असे का असते, यामागे शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे आहे. "आपल्यातले काही लोक अधिक वाचक आणि काही कमी का अषातात, याबाबत जर्मनीचे वैज्ञानिक कार्ल वेर्निक यांनी १८७४ साली शोधून काढलेल्या मेंदूतील 'वाचन स्नायू'चा भाग महत्वपूर्ण मानला जातो. आपल्या मेंदूत डाव्या कुंभखंडात (लेप्ट टेम्पोरल लोब ) मध्यसीता (सेंट्रल सल्कस ) भागाच्या वर वेर्निक नावाचा स्नायू असतो. वरकरणी पाहता मांसल दिसणारा हा भाग आपल्याला भाषेचे ज्ञान करून देत असतो, त्यामुळेच आपल्या कपाळालगतच्या कुंभखंडाला (टेम्पोरल लोब) इजा झाली तर आपण भाषा समजण्याची क्षमता गमावतो. आपल्याला वाचलेल्या शब्दांचा आणि बोलण्याचा बोध होत नाही. १८६४ मध्ये पाॕल ब्राॕका नावाच्या वैज्ञानिकाने असे दाखवून दिले होते की, मेंदूतील विशिष्ट भागास इजा झाली तर आपण उच्चार आणि व्याकरण समजण्याची क्षमता हरवून बसतो. त्या भागाला अर्थातच 'ब्राॕका' हे नाव प्रदान करण्यात आले. तर 'ब्राॕका' आणि वेर्निकचा भाग हे मेंदूतील दोन्ही भाग भाषाज्ञानाशी आणि अर्थातच वाचनाशी निगडीत आहेत. या जगजाहीर दाखल्यातील वाचनस्नायूच्या ताकदीनुसार आपल्यात साधारण, असाधारण आणि शून्य वाचक ठरत असतात." ब्राॕका यांच्या या शोधाने आपल्यातील (स्वतःतील) वाचक कमी अधिक का असते, हे कळायला मदत होईल. आपण अनेकांना सारखे म्हणत असतो, ग्रंथ वगैरे वाचत जा. यास पुढच्या व्यक्तीचा मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही. या प्रतिसादामागे वरीलप्रमाणे शास्त्रीय कारण असल्याने वाचनाची अपेक्षा करताना ब्राॕका यांना जरूर आठवावे.
अरुण व्ही. लाडे
Comments
Post a Comment