भारतीय रेल्वे वेळेवर का येत नाही ?
"प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या, भारतीय रेल नेहमीप्रमाणे उशीरा येईल. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हाला कुठलीही खंत नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी." आता असा संदेश रेल्वे स्थानकांवर वाजवायला पाहिजे.
काही अपवाद सोडले तर कुठलीही रेल्वेगाडी वेळेवर येत नाही. जग वेगात पुढे जात असताना आपण सुस्तपणे प्लेटफार्मवर नुसतेच थांबून आहोत. वेळेचे महत्व जपानकडून शिकायला हवे. तिथे अर्धाही मिनीट उशीर झाला तर संबंधित व्यक्तीद्वारे प्रवाश्यांची माफी मागितली जाते. भारतीय रेल्वे मात्र प्रवाशी हे बिनकामाचे आहेत, असे गृहीत धरून त्यांच्या त्रासाबद्दल कधीच दखल घेताना दिसत नाही.
पाच दहा मिनिटाचा उशीर तेही अत्यावश्यक कारणांमुळे होत असेल तर ते ग्राह्य आहे, पण कर्मचाऱ्यांच्या वेळखाऊ स्वभाव, सेवाभावाचा अभाव आणि सेवेप्रती गंभीर नसल्यामुळेच रेल्वे वेळेवर धावत नाही.
निर्धारीत वेळेपेक्षा दहा मिनिट उशीरा येणाऱ्या गाडीची वाट पाहत रेल्वेच्या बाकावर मी बसून आहे. पण दहा मिनिटे झाली, अर्धा तास झाला तरी येणाऱ्या गाडीला प्लेटफार्मच मिळत नाही. आता तीच गाडी सव्वा तास उशीरा येईल म्हणून रेल्वेकडून प्रदर्शित केल्या जाते. प्रत्यक्षात ती पाऊणेदोन तासानंतर. तो पर्यंत रेल्वेच्या भोंग्यातून कर्णकर्कश आवाजात सूचनांचा भडीमार सुरू असतो. प्रवासी हा कामासाठीच प्रवास करत असतो. कधी झोपमोड करून तर कधी कसा, तो रेल्वे स्थानकावर पोहोचतो. रेल्वे एवढ्या उशीरा येत असल्याने त्याला जो शारीरिक आणि मानसिक त्रास होतो, त्याची भरपाई रेल्वे करेल का ?
प्रत्येक रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्यांपैकी एखादी गाडीच अपवाद म्हणून वेळेनुसार येते. यानुसार रेल्वेच्या वेळेवर धावण्याची रासरी काढली तरी 0. काही तरी येईल.
मोठ्या उत्साहात निघालेल्या प्रवाश्यांना अशा प्रकारे नेहमीच त्रास होत असेल तर रेल्वे यातून केव्हाच धडा घेणार नाही का ? सुधारणा ही विकासासाठी अत्यावश्यक आहे. रेल्वेचा विकास नवे मार्ग आणि फक्त गाड्यांची संख्या वाढवून होणार नाही तर ही सेवा वेळेत दिली तरच होणार आहे.
यासाठी नवीन साफ्टवेअर रेल्वेद्वारे तयार करायला पाहिजे. रेल्वेला उशीर कशामुळे व किती झाला ? याचा हिशोब ते साफ्टवेअर ठेवेल. आणि संबंधित कर्मचाऱ्यांस त्यास कारणीभूत धरून त्याच्या वेतनातून दंड म्हणून काही रक्कम वजा करावी. तेव्हाच यांना वेळेचे महत्त्व कळेल. कामाशी बांधिल राहावेच लागेल. सुस्त झालेली रेल्वे वेळेत धावण्यासाठी प्रामाणिकपणे उपाययोजना करायलाच हवी, ही काळाची गरज आहे.
जगातील रेल्वेचे प्रचंड जाळे असलेल्या देशांमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो. अवाढव्य देशाची रेल्वेही अवाढव्यच आहे. अमेरिका, चीन, रशिया नंतर भारताचा नंबर लागतो. अमेरिकेत 250000 कि.मी. एवढे रेल्वेचे जाळे पसरले आहे. चीनमध्ये 100000 कि. मी., रशियात 85500 कि. मी. तर भारतात 65000 कि. मी. (2013 या वर्षीचे हे आकडे आहेत. मागील 10 वर्षात यात वाढ झाली आहे.) रेल्वेचे जाळे पसरले आहे. जगात चौथ्या नंबरवर असलेली रेल्वे मात्र प्रवाशी वाहतुकीत मात्र नंबर एकवर आहे. भारतीय रेल्वे दररोज तब्बल 8 करोड प्रवाशांची वाहतूक करते. चीनी रेल्वे 2 करोड 80 लाख प्रवासी वाहतूक करते तर रशियन रेल्वे 1करोड 80 लाख एवढी. इतर देशातील हे प्रमाण पाहिले तर भारतीय रेल्वेचा अभिमान वाटेल पण तिच्यावरील ताणही लक्षात येईल. भारतीय रेल्वे ही 17 झोनद्वारे 19000 हजार रेल्वेगाड्या चालतात. त्यापैकी 12000 प्रवासी गाड्या आहेत.
जपानमध्ये ३०,६२५ किमी रेल्वेचे जाळे आहे. 31 मार्च 1996 पर्यंत JR (JNR च्या खाजगीकरणानंतर स्थापन झालेल्या कंपन्यांचा समूह) या मार्गांपैकी 20,135 किमी नियंत्रित करत होते, उर्वरित 7,133 किमी खाजगी उपक्रम स्थानिक रेल्वे कंपन्यांच्या हातात होते. जपानच्या रेल्वेने 2013-14 मध्ये 9.147 अब्ज प्रवाशांनी प्रवास केला. त्या तुलनेत, जर्मनीमध्ये ४०,००० किमी पेक्षा जास्त रेल्वे आहेत, परंतु दर वर्षी फक्त २.२ अब्ज प्रवासी वाहतूक करतात. रेल्वे प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे जगातील 50 सर्वात व्यस्त स्थानकांपैकी 46 स्थानके जपानमधली आहेत.
बुलेट ट्रेन भारतात सुरू करण्याची इच्छा बाळगणे वाईट नाही, पण आहे ती नीट चालवणे व पुढचा टप्पा गाठणे योग्य ठरेल. जपानी रेल्वे जगातील सर्वाधिक वक्तशीर रेल्वे आहेत. आर्थिक वर्ष 2018 मध्ये टोकाइदो शिंकनसेनवर सरासरी विलंब 0.7 मिनिटे होता. जेव्हा गाड्यांना पाच मिनिटे उशीर होतो, तेव्हा रेल्वे पायलट उशीराबद्दल दिलगिरी व्यक्त करत घोषणा करतो आणि रेल्वे कंपनी "विलंब प्रमाणपत्र" देते. जपानी प्रवासी मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतुकीवर अवलंबून असतात आणि ट्रेन वेळेवर चालतात हे गृहीत धरतात. जेव्हा गाड्या एक तास किंवा त्याहून अधिकारी क उशिरा येतात, तेव्हा ती वर्तमानपत्रातील बातमी होते. आपल्याकडे तीन चार तास रेल्वेचे उशीरा येणे सामान्य बाब ठरते. रेल्वेची ही कार्यशैली लोकांच्या अंगवळणी पडली आहे. पण हीच गोष्ट भारतीय जनमानसात रुजल्याने वयक्तिक आणि राष्ट्रीय नुकसान किती होत आहे ? याची जाणीवच आपल्याला नाही. वेळेचे महत्व जो समजला तोच पुढे गेला, हे आपण मानतो. प्रत्यक्षात मात्र अनेक संस्थात्मक कार्यशैलीत ते दिसत नाही. परिणामतः भारत विकसित देशांच्या अनेक वर्षे मागे राहिला.
भारतात आता रेल्वेचे खाजगीकरण करणे हळूहळू सुरू झाले आहे. जपानमधील प्रादेशिक सरकारे आणि खाजगी कंपन्यांनी संयुक्तपणे वित्तपुरवठा केलेल्या कंपन्या देखील रेल्वे सेवा प्रदान करतात. ही सेवा उच्च दर्जाची आणि काटेकोर असते. भारतात मात्र खाजगीकरण म्हटले की फक्त फायदा आणि सेवेचा खालावलेला दर्जा, या बाबीच प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे भारतीय रेल्वेचे संपूर्ण खाजगीकरण झाले तर त्या जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील ? ही मोठीच शंका आहे. सार्वजनिक सेवेची संस्कृती वर्तमानात रूजली तरच हे शक्य आहे. आणि राजकीय महत्वकांक्षेशिवाय तर हे अशक्यच आहे.
डॉ. अरुण व्ही. लाडे
Comments
Post a Comment