जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

 जयंती:  वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

                चित्रपट नेहमीच भारतीय समाजाला भूरळ पाडत आला आहे. लहानमोठ्यांचा हा आवडीचा विषय. प्रेमकथांची भरमार असणाऱ्या भारतीय सिनेमात राज कपूर यांनी काही हिंदी चित्रपटांमधून समाज वास्तव मांडले आहे. सलीम-जावेद जोडीने बदलत्या जमान्यानुसार डॕशींग हीरोपटाच्या कथा लिहिल्या. सत्यजीत रे, श्याम बेनेगल, राकेश मेहरा, मेहमुद यांनी नवे काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या भारतीय हिंदी चित्रपट विश्वाला असे बोटावर मोजता येईल, एवढेच नावं सांगता येणे, ही आपल्या सिनेमाची शोकांतिका आहे. काळानुसार बदलने जीवंतपणाची लक्षण आहे, पण हिन्दी सिनेमा मात्र सडक्या पाण्यात तरंगत राहिला. काहिंनी या भिंती तोडून नदीसारखे प्रवाहित होण्याचा प्रयत्न केला. आज  नवनव्या प्रयोगांसह समाजवास्तव घेऊन चित्रपट येताहेत, पण ते प्रादेशिक आहेत. तमीळ, मराठी मधून आशादायक चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'जयंती' नावाचा मराठी चित्रपट जीवंतपणा देणारा असा आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षाच्या निर्बंधानंतर आलेला पहिलाच मराठी चित्रपट. आपल्या मराठी सिनेमाची नवी दिशा कशी असेल, हे दर्शवणारा हा चित्रपट आहे. 

              जय भीम चित्रपटानंतर एक अर्थपूर्ण चित्रपट पाहिल्यामुळे फार आनंद झाला. तेही मराठी चित्रपट. नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हणे यांसारख्या प्रयोगशील दिग्दर्शकांच्या पंगतीत आता शैलेश नरवाडे यांची भर पडली आहे. निश्चित भूमिका, सुत्रबध्द मांडणी, मनोरंजकतेसह वैचारिक संदेशाची पेरणी करणे लेखक-पटकथा-दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांना चांगले साधले आहे. चित्रपटातील नायक ऋतूराज वानखेडे याने दमदार काम केले आहे. नालायक  व्यक्तीचा लायक होण्याचा प्रवास त्याने मोठ्या ताकदीने निभावला आहे. चित्रपटातील पार्श्वभूमी नागपूर भागातील आहे, पण भाषा म्हणून  झाडीपट्टी बोलीभाषेचा वापर झालेला आहे. ऋतुराजने या भाषेला न्याय दिले आहे. सर्वच कलावंतांचे  वास्तवदर्शी अभिनय आहे. चहाच्या दुकानात बसून वायफळ चर्चा करणाऱ्या पासून नायकाची आई, त्याचे मित्र, आमदार हे सारेच आपल्या जवळचे वाटतात. एवढे ते आपल्या भूमिकेत मिसळले दिसतात. आम्हीच खरे शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, आम्हीच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त आहोत, असे म्हणत धिंगाणा घालणाऱ्या, निव्वळ पोकळ जयजयकार करणाऱ्या पोरांनी तर हा चित्रपट बघायलाच पाहिजे. खरा शिव भक्त वा भिम भक्त कसा असावा, हे या चित्रपट पाहिल्याने नक्की कळेल.


सत्याचा प्रवास

               भारतीय समाज हजारो वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, राजकीय सत्य- असत्याच्या द्विधा स्थितीत राहीला आहे. आपल्या महापुरुषांनी सत्याची बाजू घेत समाजाला नेहमीच  सत्याचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  तरी सुध्दा आजही इतिहास असो वा राजकीय, याबद्दल समाज सत्यापासून लांबच आहे. जयंती चित्रपटातील नायकाचा हा असत्याकडून सत्यापर्यंत पोहचण्याचा प्रवास अप्रतिम साकार झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समाजात जी असुया व अढी आहे, त्यातूनच त्यांचे कार्य-विचार स्विकारण्याचा मोठेपणा आजही दिसत नाही. बाबासाहेबांचे नाव घेताच अनेक जातीतील लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात. हे वास्तव  चित्रपटात प्रतिबिंबित झाले आहे. नायक संत्या हा मराठा जातीतील असून गोंडान्ने नावाच्या आमदाराचा कार्यकर्ता आहे. आमदार जे म्हणेल ते मुकाट्याने करणे, हेच त्याचे कर्तव्य. १० वी नापास असलेला या संत्याची महार जातील मुलांशी चांगली मैत्री असते,  पण ते राजकारणासाठीच. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी संत्या आणि त्याचे मित्र आमदाराकडे जातात. आमदार संत्याकडे तिस हजार रुपये देतो. तेव्हा संत्या मित्रांकडे पाहत, 'यांच्याकडे द्या. यांच्या बापाची जयंती आहे.' असे म्हणतो. तो कार्यक्रमासाठी पैसेही घेत नाही,  बाबासाहेबांबद्दल त्याच्या मनात एवढी अनास्था आहे. संत्यांच्या घरच्यांमध्येही बाबासाहेबांबद्दल द्वेषाचीच भावना आहे.

             महापुरुषांची जयंती ही फक्त कार्यक्रम आयोजित करण्यापुररतीच केली जाते. या चित्रपटात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. बाबासाहेबांची जयंती साजरी करताना एकीकडे डीजे लावून नाचगाणे सुरू आहे तर दुसरीकडे माळी सर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत आहेत.  महापुरुषांचे विचारच आपला समाज उन्नत करू शकतात, असे लेखक-दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे.  हीच जयंती संत्याच्या आयुष्य *360 डीग्रीत पार बदलून टाकते.* घरच्यांच्या दृष्टीने नालायक व वस्तीसाठी गुंड अशी त्याची प्रतिमा असते. पण एका घटनेने तो महापुरुषांच्या विचार व कार्याशी जोडला जातो. आंतर्बाह्य बदलवून टाकणारा हा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. 

               मिश्र जातींची ही वस्ती आहे. बहुसंख्य मराठा आहेत. याच वस्तीत ओ बी सी समाजातील माळी सर शाळा व्हावी म्हणून प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांचे वर्ग घेतात. आमदार गोंडान्ने यांना मात्र स्मारक उभारायचे आहे. अर्थात हे राजकारणस्वार्थ पुढे ठेऊनच त्यांची धडपड सुरू असते. माळी सर त्यांना शाळेसाठी गळ घालतात, पण यांच्या या मागणीकडे संत्यासकट आमदार दुर्लक्षच करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या मनात असतील तर जागोजागी त्यांचे स्मारक उभारण्याची गरज काय? त्यांनी सांगितलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या विचारांचे काय ? शिक्षणानेच व्यक्ती वैचारिकदृष्ट्या विकास पावतो. त्याला सत्य व असत्य यातील फरक कळतो. याचा राजकारणी आणि समाज विचारच करीत नाहीत, चित्रपट पाहताना याची प्रकर्षाने जाणीव होते. 

               चित्रपटातील नायक तर राजकीय गुंडच असतो. तो ज्या शिवरायांचा स्वतःला मावळा  समजतो त्यांच्याविषयी त्याला फार थोडी माहिती असते. जय शिवाजी म्हणण्यापलिकडे त्यांचा अभ्यास नसतो. मीच खरा शिव भक्त अशा तोऱ्यात तो एकदा मुस्लिम डेकोरेशन वाल्याचा अपमानही करतो. शिव जयंतीला तू दिसायचा नाहीस, तू डेकोरेशनही नको अशी धमकीही देतो. या मुसलमान तरुणाची मात्र शिवरायांवर अपार श्रध्दा असते. तो तरुण म्हणतो, 'तुझ्या सारख्यांकडून  शिवाजी महाराज जाणून घ्यायची गरज नाही आहे. आमच्या पूर्वजांनी शिवरायांची कर्तबगारी व विचार आम्हाला सांगितले आहेत.' मुसलमान आणि शिवाजी महाराज यांच्यात नेहमीच द्वेष पेरणाऱ्या वृत्तींना ही जब्बर चपराक आहे. कारण अनेक मुसलमान योध्यांना महाराजांनी मानाची व जबाबदारीची जागा दिली होती, याचाही उल्लेख पुढे चित्रपटात येतो. तेव्हा चित्रपटगृहात तर टाळ्यांचा गजर होतो. 

               जसे साहित्याचे झाले तसे चित्रपट क्षेत्रातही होईल. एकेकाळी अखिल भारतीय साहित्यात स्त्रियां, उपेक्षित, दलित,  यांविषयी लिहिले जात नव्हते. परंतू १९६० नंतर दलित साहित्यिकांनी नवे सामाजिक चित्र रेखाटायला सुरूवात केली. वास्तवतेला प्रखर लेखनाची साथ मिळाली की कलाकृती  अंगार घेऊन अवतरते. दलित साहित्यिकांनी मराठी साहित्यात वणवाच पेटवला. यात रूढ साहित्य परंपरा पोळून निघाल्या. आपल्याच भारतीय समाजात असाही समाज राहतो जो आपलाच भाग आहे, हे रूढ साहित्यिकांना दिसलेच नाही. खालच्या समजल्या जाणाऱ्या दलित जातींना साहित्यात स्थान दिलेच गेले नाही. फार तुरळक अपवाद सोडले तर उपेक्षित-दलित व्यक्ती साहित्याचा विषय बनलाच नाही. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून पुढे दलित साहित्यिकांनी आपले एक स्वतंत्र अवकाश तयार केले. या साहित्य प्रवाहाशिवाय आज भारतीय साहित्य विश्वाची कल्पनाच करता येत नाही. चित्रपट क्षेत्रात, विशेषतः हिन्दी बाॕलीवूडमध्ये नेपोटीजम, जातीभेद, स्त्रीभेद या सारख्या समस्यांमुळे गुणवंत मागे पडत आहेत. अथवा या क्षेत्रापासून दूर पळत आहेत. शैलेश नरवाडे यांच्यासारखे प्रतिभावंत दिग्दर्शक हिम्मत करून चित्रपट तयार करतात. मराठी चित्रपटसृष्टी मात्र याची दखलही घेत नाही, अशी दिग्दर्शकाची खंत आहे. यावरून मराठी चित्रपटसृष्टीलाही जातीभेदाने ग्रासले आहे, हे सिद्ध होते. जयंती चित्रपटात नव्वद टक्के कलावंत-तंत्रज्ञ बहुजन समाजातील आहेत. कला असो वा शिक्षण अथवा नोकरी, व्यवसाय बहुजणांना संधी मिळाली तर तो आपले अस्तित्व सिध्द करतोच. जयंती चित्रपटाने हे दाखवून दिले आहे. चित्रपट निर्मिती ही सुध्दा बहुजनातीलच काही लोक एकत्र येवून केली आहे. असाच एक पुढे येऊ घातलेला हिन्दी चित्रपट आहे भिमा कोरेगाव. माजी आयएएस रमेश शेट्ये यांनी दिग्दर्शित केलेला हा भव्यदिव्य चित्रपट आहे. या चित्रपटाचा बजेट व कॕनवासही मोठा असल्याने चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होतील तेव्हाच हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

               उपेक्षित समाजातील घटकांना चित्रपटाचा विषय करण्यासाठी तसे अभ्यासू आणि व्यापक तथा समतावादी विचारांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते असणे आवश्यक आहे. हिन्दी चित्रपटसृष्टित नेमकी याचीच वाणवा आहे. काला, कबाली, असुरन, सरपट्टा, जय भीम यासारखे अप्रतीम  चित्रपट तमीळ चित्रपटसृष्टीत बनतात तर आर्टीकल १५ सारखा एखादा सुंदर चित्रपट हिन्दी बालीवूड मध्ये बनतो. हिन्दीच्या मानाने मराठी स्थिती चांगली म्हणायला हवी. येथे सपोर्ट मिळत नसले तर स्व हिमतीवर शैलेश नरवाडेंसारखे काहीजण प्रयत्न तरी करतात.

              जयंती चित्रपटात एका घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये नायक संत्याही आमदाराची बाजू घेतो. अशा प्रसंगी राजकीय शक्तीचा वापर करून असे कितीतरी प्रकरणं दडपली जातात, याचे वास्तवदर्शी चित्रण जयंती मध्ये केले आहे. एक सामाजिक कार्यकर्ती व स्थानिक तरुण न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात.  अन्यायग्रस्त स्त्रीचा पती शंका व्यक्त करताना म्हणतो की,' कुठे  न्याय मिळते भाऊ, तो मास्तर ओ बी सी, आम्ही आदिवासी तुम्ही एस. सी. महार. आम्हाले का मदद कराल.' त्यावर एक कार्यकर्ता म्हणतो, 'आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, आम्ही न्यायासाठी लढतो. जात पाहून आंदोलन करत नाही.' या एका वाक्याने बाबासाहेबांच्या संघर्षाचे विचार महार जातीत कसे भिनले आहे याची प्रचिती  येते.

             राजकारणासाठीच महापुरुषांचा वापर होत आला आहे. बहुतेक  नेत्यांना विचारांशी काही देणेघेणे नसते. ग्रामीण भागात आजही आंबेडकर द्वेष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. वाचणाच्या अभावामुळे म्हटले तर हे अर्धसत्य आहे कारण शिक्षित व्यक्तींनाही बाबासाहेब व  त्यांच्या कार्याचे ज्ञान नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अनेकविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना काम करताहेत. त्यांनी सुध्दा शिवाजी महाराजांना सर्व जाती धर्मापर्यंत न पोहोचवता वादच निर्माण केले आहे. १९९२ नंतर जय शिवाजी चा नारा देत ग्रामीण भागातील दलित समाजाला अतोनात त्रास दिला गेला. ज्या शिवाजी महाराजांना महार जातीच्या सैनिकांनी भक्कम साथ दिली. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांच्या वस्त्या जाळल्या गेल्या. अनेकांचे प्राण घेतले गेले. या प्रकारामुळे या समाजाला शिवाजी महाराज परके वाटायला लागले. पुढे मात्र बहुजन समाज पार्टीच्या येण्याने बहुजन नायकांचा खरा इतिहास कळू लागला. याचेच परिणाम म्हणजे आज महार जातीच्या लोकांच्या घरी बाबासाहेबांच्या फोटोसोबत शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज यांचे फोटो असतातच. हा वैचारिक बदल वाचणाने शक्य झाला. ओ. बी. सी., मराठा जातींमध्ये याचाच अभाव आढळतो. जयंती चित्रपटात नेमके यावरही बोट ठेवले आहे. संत्या हा शिक्षणामुळे व पुस्तक वाचणाने सत्य जाणतो. तेव्हा तो आमुलाग्र बदलतो. चित्रपटात अनेक प्रसंग आहेत जे आपल्याला नवा अनुभव देणाऱ्या आहेत. याचा आनंद प्रत्यक्ष चित्रपट पाहताना अधिक घेता येईल.

               आपल्या भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील महापुरुषांनी भारत समाजाला एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न केले. जाती, धर्म, संप्रदाय, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेद न करता भारतीयांच्या सर्वांगिन विकासाचाच विचार केला. मात्र आपण आमच्या तुच्छ, क्षुद्र राजकीय- सामाजिक स्वार्थासाठी त्यांची विभागणी करून टाकली. त्यांच्या कार्य व विचारांना संकुचित करून टाकले. आज शिवाजी महाराज, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, पेरीयार इ. महापुरुषांच्या खऱ्या विचार-कार्यांची ओळख  करून देणे अत्यावश्यक झाले आहे. 

डॉ. अरुण लाडे

 (दि.२९/११/२०२१ )

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

तू रोज येतेस.....