झुंड - नाम ही काफी है.
झुंड - नाम ही काफी है.
बहुचर्चित तथा बहुप्रतिक्षित "झुंड" हिन्दी चित्रपट ४ मार्चला भारतभर प्रदर्शित झाला. नागराज मंजुळेचा चित्रपट म्हणजे नवे काही असेलच अशी प्रेक्षकांची भावना असते. प्रेक्षकांची ही अपेक्षा नागराजने पूर्ण केली आहे.
नागपूर येथील प्रा. विजय बारसे यांनी फुटबालद्वारे झोपडपट्टीतील मुलांचे आयुष्य बदलवले. त्यांनी स्लम साॕकर नावाची संस्था स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या मुलांसाठी फुटबाल या खेळाचे मंच उपलब्ध करून दिले. त्यांना वाईट व्यसनाकडून खेळाकडे आकर्षित केले. झुंड हा चित्रपट प्रा. बोरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
झोपडपट्टी म्हटले की सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन बहुतेक वाईटच असतो. येथे नशा करणारी, चोऱ्या व मारामारी करणारी मुलं असतातही, पण त्यामागील कारणांचा शोध कोणी घेताना दिसत नाही. झोपडपट्टी व तेथील लोकं घाणेरडेच, हाच समज रूढ झालेला आहे. या रूढ समजाला छेद देण्याचे काम झुंड या चित्रपटाने केले आहे.
चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारे अमिताभ बच्चन यांनी सहज सुंदर अभिनय केले आहे. चित्रपटात कुठेही त्यांनी आपल्या महानायकपदाचे लेबल लावून काम केले नाही. त्यामुळे त्यांची भूमिका विजय बारसेंच्या रूपात जीवंत होते. नागराज मंजुळेंच्या आजवरच्या चित्रपटातील सर्व कलावंत झुंड मध्ये आहेत, हे चित्रपटाचे वैशिष्ट्यही म्हणता येईल. सर्व कलावंतांनी अभिनयाच्या बाबतीत बाजी मारली आहे. या चित्रपटात बहुतेक कलावंत नवीनच आहेत. यांचे अभिनय एवढे खरे आहे की त्यांचे नवखेपण कुठेही जाणवत नाही. कलावंतांची अभिनयातील कोरी पाटीच नागराज मंजुळेंच्या चित्रपटांची ताकद आहे. त्या कोऱ्या पाटीवर नागराज हवे तसे अक्षरचित्र काढतो. त्यातून एक सकस, सुंदर निर्मिती होते. झोपडपट्टी पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात झोपडपट्टीतीलच मुलं घेऊन चित्रपट बनवणारा नागराज अफलातून दिग्दर्शक आहे. झुंड चित्रपटाच्या स्क्रीनींग नंतर अनेक पत्रकारांनी कलावंतांना भेटण्याची उत्स्कुता बोलून दाखवली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोणाच्याही खिजगिनतीत नसलेल्या या कलावंतांना जाणून घ्यायचे आहे, हेच यांच्या अभिनयाची पोचपावती आहे.
झुंड हिंदी चित्रपट असला तरी अमिताभ यांना सोडून सगळी मराठी भाषिक आहेत. मराठी माणसाची हिन्दी कथा नागराज मंजूळेंनी लार्जन दॕन लाईफ बाॕलीवुडच्या भव्य पडद्यावर साकार केली आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे. अजय अतुल यांच्या संगीताने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. मागील चित्रपटात दिलेल्या संगीताचा पुढील चित्रपट संगीतावर कुठलाही प्रभाव नसणे हे अजय-अतुल यांचे मोठेच कौशल्य आहे व वैशिष्ट्यही. हिपहाॕप आणि वेस्टर्न म्युझिक चे बेस असलेले हे संगीत नवा अनुभव देते. नव्या आगळ्या बिट्स, रिदमसह झुंड मधील संगीत वेगळा प्रभाव पाडतो. येथील गीत चित्रपटाचे सार सांगणारे आहे. झोपडपट्टीतील जीवन, या लोकांच्या भाव भावना गीतकाराने अलगद मांडल्या आहेत.
"हमको दुनीयाने रोज देखा है
फिर भी अनदेखा झुंड है
हम ना जिंदा थे हम ना मरते है
लोग कहते है झुंड है
क्या फायदा अपूनके जिंदा लाश पे रोनेका
खतम हुआ जो भी कमाया अब क्या खोने का
अपूनकी बस्ती गटरमें है पर तुम्हारे अंदर गंद है....."
सध्या गाजत असलेल्या याच चित्रपटातील लफडा झाला या गीताचे बोलही बरेच काही सांगणारे आहे.
"मिले कोई हमसे उसे खडे खडे ही गाड दे
छोडे नही कुछ भी कसर पुरा हुलीया बिगाड दे
करे नही बोल बच्चन खाली पीली नही भोंकते
सटके जो अपना मगज कसके दहाड दे
किया किसने भी हमसे झगडा, हे झगडा रे
आगे जो भी सामनेसे अकडा
सीधा गीरेबान उसका पकडा, हे पकडा रे
तोडा फिर हाथ पाव जबडा,
लफडा झाला वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा...
जहां जहां धुमधाम वहां वहां घुमघाम आ गए आ गए आ गए
बडा बडा घाव घाव, वडा वडा पाव पाव
जानके खा गए खा गए खा गए
लेना देना अपना क्या है. तडक भडक बंगलो से
अपना तो सडक आशियाना है,
और फुटपाथ नर्म नर्म तकीया है
खुला आसमाँ शामियाना है
हमे दुनिया जहाँ ने रगडा, हे रगडा रे
किया इस दिल पे वारा तगडा, हे तगडा रे
गाली फटकार खाके अपनी हडीया
बनी लोखंड और लकडा,
हे लफडा झाला वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा...."
या गितांंतून झोपडपट्टीचे जीवन व त्यांच्यातील टशन प्रतिबिंत झाले आहे.
लात मार हे गीत व याचे संगीत तर वेगळ्याच पातळीवर घेऊन जाणारे आहे.
"जमाने की नजर में तू भलेही भंगार है
तेरे भी सीनेमें कही तो एक अंगार है
जलादे हैसीयत की आज बेड्डीया
चला दे तोफ की तरह ये एड्डीयां
लात मार... लात मार... लात मार..."
सैराट चित्रपटातील नायक आकाश ठोसर आणि रिंकू राजगूरु हे दोन्ही झुंड चित्रपटाचे सरप्राईज फॕक्टर आहेत. रिंकू आणि आकाश दोघांचेही अभिनय मस्त आहे. आकाशची भूमिका तर प्रेक्षकांना धक्का देऊन जाते.
नागराज मंजुळे यांची डायरेक्शनची एक खास शैली आहे. त्याला कॕमेराची चांगली साथ लाभली तर कथा, पटकथा, अभिनय सारेच जीवंत आणि प्रभावी ठरतात. सुधाकर रेड्डी ( 'नाळ' चित्रपटाचा डायरेक्टर) यांनी आपल्या कॕमेराद्वारे कमाल केली आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर म्हणजे चित्रपटगृहात जाऊनच बघण्यासारखा आहे. चांगल्या चित्रपटांचा अनुभव घेण्यासाठी एकत्रित परिणाम होणे गरजेचे असते. पार्श्वसंगीत हे या परिणामाला अधिक भक्कम करते. झुंडमधील पार्श्वसंगीत (बॕकग्राऊंड म्युजिक) चित्रपटाला प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.
या चित्रपटात एक प्रसंग आहे, झोपडपट्टीतील मुलं विजय म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या घरी आपला परिचय देताना आपला अनुभव व अडचणीही सांगतात. तेथीलच एक मुलगा अमिताभ बच्चन यांना बँजोवर "सारे जहाँ से अछा हिन्दुस्थाँ हमारा" हे गीत वाजवून दाखवतो. पुढे हे सांगताना कलाकारांचा आवाज म्युट होतो व हे गीत बँजोवर वाजतो. या पोरांना आपल्या देशात कितीही अडचणींना तोंड द्यावे लागत असले तरी आपला भारत त्यांना सर्वात प्रियच वाटतो. पण इतरांना हे मुलं प्रिय वाटतील का ? हा खरा प्रश्न आहे. बाॕलीवूडची मरगळ दूर करून नवा जोम भरणारा हा चित्रपट एकदा बघायलाच हवा.
👤डॉ. अरुण व्ही. लाडे
दि. ०५ मार्च २०२२
Comments
Post a Comment