दोरीवरचा खेळ

 

            आज रस्त्याच्या कडेला दोरीवरून चालण्याचा खेळ सुरू होता. १०-१२ वर्षाची मुलगी दोरीवर आपली कला सादर करत होती. काही लोकं दुरूनच हा खेळ बघत होते. रखरखती ऊन तसेच आपण जवळ गेलो तर आपल्याला पैसे द्यावे लागतील, हाही यामागे कारण असावा. 

           मी गाडी थांबवली. कोणत्या गावचे म्हणून विचारले. मुलीच्या आईने, आम्ही बिलासपूरचे आहोत, एकदम बारक्या आवाजात सांगितले. दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार. वडील दोरीच्या खाली उभा होता. मुलीला सावरण्यासाठी असेल. मुलगी नुकतीच दोरीवरचे खेळ करायला लागली होती. म्हणून बापाला थोडी भीती वाटत होती. तो तिच्यावर नजर रोखून होता. तिने दोरीवरून एक फेरी पूर्ण केली. आईच्या चेहऱ्यावरील निस्तेज भाव पाहून मी विचारलो, ताई तुम्हाला बरं नाही का? 

"नाही जी. सकाळपासून काही खाल्ले नाही. या ऊनात बसून चक्कर आल्यासारखी वाटते."

           गावातील लोकं फक्त पाहणारे होते. दोन दिवसांपासून त्यांना खेळ करून फक्त  पन्नास रुपये मिळाले असतील. तिसऱ्या दिवशी मोठ्या उमेदिने त्यांनी  खेळ सुरू केला. मुलगी आपल्या चालण्यावर लक्ष केंद्रित करून दोरीवर पाय टाकत होती. त्या बारीक बिचाऱ्या जिवाकडे बघून मोठेच वाईट वाटले. मी खिशातून दोनशेची नोट मुलीच्या हातात ठेवली. ती माझ्याकडे पाहत राहिली. बापाने माझ्याकडे बघून दोन्ही हात जोडले. त्याच्या पानावल्या डोळ्यात मला माझाच बाप दिसला. मग मी लगेच गाडी स्टार्ट केली.

👤 डॉ. अरुण लाडे

दि. २ मार्च २०२२ 

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....