आता या मैत्रीची समीक्षा व्हायलाच हवी

 आता या मैत्रीची समीक्षा व्हायलाच हवी

              संपूर्ण जगात आज युध्द विषयक चर्चांना उधान आले आहे. त्यामागे युक्रेन व रशिया दरम्यान चांललेले युध्द हे कारण आहे. रशिया हा  युक्रेनला धडा शिकवण्याच्या मुजोर जिद्दीने सैनिक कार्रवाईच्या नावाखाली युक्रेनशी युध्द सुरू केले. युध्द हे कधीच फायद्याचे नसते. आर्थिक आणि जिला कधीच भरून काढता येत नाही ती जिवित हानी मोठ्या प्रमाणात होते. जगाला दोन महायुध्दांचा अनुभवही आहे. त्याआधी राजेशाही व्यवस्था असताना युध्द व्हायचे ते आपल्या देशाच्या सिमा वृध्दींगत करण्यासाठी. ती व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर बहुतेक सिमा ठरल्या गेल्या. काही देशांमध्ये सिमा विषयक वादही  सुरू आहेत. याच वादातून बहुतेककरून युध्दजन्य परिस्थिती निर्माण होत आहेत. युक्रेन हा देश पूर्वी संयुक्त रशियाचा भाग होता. त्यापूर्वी तो १७ व्या आणि १८ व्या शतका दरम्यान  एक देश म्हणून समृद्ध झाला पण शेवटी  पोलंड आणि रूसी साम्राज्यात  विभाजित झाला. रूसी क्रांति नंतर आत्मनिर्णयासाठी एक यूक्रेनी राष्ट्रीय आंदोलन निर्माण झाला.  ज्याने २३ जून १९१७ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त यूक्रेनी पीपल्स रिपब्लिकचे गठन केले गेले. अल्पकालिक राज्याला बोल्शेविकांद्वारे  यूक्रेनी सोवियत समाजवादी गणराज्य मध्ये जबरदस्तीने  पुनर्गठित केले गेले. युक्रेन  १९२२ मध्ये  सोवियत संघाचा संस्थापक सदस्य झाला. रूसी सोवियत गणराज्यानंतर यूक्रेन हे सगळ्यात अधिक लोकसंख्या असलेले औद्योगिक गणराज्य होते. १९९१ मध्ये सोवियत संघाच्या विघटनानंतर इतर राष्ट्रांप्रमाणे युक्रेन स्वतंत्र राष्ट्र झाले.

            युक्रेन हे  रूस नंतर यूरोपातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. 4 करोड 36 लाख लोकसंख्या असलेला यूक्रेन यूरोपातील आठवां जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. युक्रेनची राजधानी  कीव हे शहर आहे. याच किव शहराला काबीज करण्यासाठी रशिया आपला 46 कि.मी. चा सैनिकी ताफा घेऊन किव शहराकडे निघाला आहे. 

             दुसऱ्या महायुद्धात रशियाची भूमिका फार महत्त्वाची होती. हिटलरच्या अति महत्वकांक्षेमुळे आधी दोस्त असलेल्या  रशियावर जर्मनीने आक्रमण केले. रशियाने चिवटपणे लढा दिला आणि युध्दाचे चित्र पालटून टाकले. पुढे जगाच्या इतिहासाच्या पुलाखालून बरेच पाणी गेले. जपानला युध्दामुळे बरेच गमवावे लागले. या देशाने आपले युध्दनितीचे धोरण बदलून विकासाचे धोरण अवलंबले. यामुळे जपान एकेकाळी क्रमांक एकची आर्थिक महासत्ता बनला. रशियाला मात्र विघटनास सामोरे जावे लागले. रशिया आर्थिकदृष्ट्या कमकूवत बनला. ब्लादिमीर पुतिन यांना मात्र हे सहन होण्यासारखे नसावे, हे त्यांच्या ध्येय धोरणावरून स्पष्ट होते. जसे हिटलरने पहिल्या युध्दामुळे गमावलेले मान सन्मान मिळवण्यासाठी व सुड भावनेने दुसऱ्या महायुध्दाला सुरूवात केली.  याच वाटेने रशियाचे ब्लादीमीर पूतिन जात आहेत. युक्रेन व तेथील जनता आपले खुशहाल आयुष्य जगत असताना अलगाववाद्यांना मदत करण्यासाठी युक्रेनवर युद्ध थोपवले. एका स्वतंत्र राष्ट्रावर आक्रमण करून त्याची जमीन बळकावणारा देश भारताचा मित्र राहू शकतो का ? या मैत्रीची वर्तमानात गंभीरपणे समीक्षा करणे गरजेचे आहे. आपला मित्र आहे म्हणून तो कसाही वागला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्याचे समर्थन केल्यासारखे आहे. याची प्रतिक्रिया युक्रेन मधील सैनिकांद्वारे अप्रत्यक्षपणे दिली जात आहे. ज्या देशाने हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण व इतरही मदत केली. त्यांच्या देशाने युद्धाविरोधात कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही, या विचारामुळे तेथील सैनिकांनी  भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर पडण्यासाठी मदत न करता मारपीट केली. 

            भारताचे स्पष्ट धोरण आहे की, आम्ही कोणत्याही देशावर आक्रमण करणार नाही. देशाचे रक्षण करण्यासाठी मात्र शस्त्र हाती घेतले जातील. भारताने कधीच दुसऱ्या देशाच्या जागेवर आपला हक्क सांगितला नाही. जे आहे त्यात आपण खूष असतो. पण चिन किंवा राशियाचे तसे नाही आहे. हे देश आजूबाजूच्या देशांवर आपल्या सैनिकी शक्तिचा वापर करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असतात. रशिया-भारत मैत्रीचे आपण नेहमीच गोडवे गात असतो. १९७२ च्या भारत-पाकिस्तान युध्दात रशियाने शस्त्र व आंतरराष्ट्रीय राजकारणातही मदत केली होती. त्या बदल्यात भारताने रशियाला आर्थिक स्वरूपात मोबदलाही दिला. शस्त्रे काही फूकट घेतली नाही. शस्त्रे विकून आर्थिक बाजू भक्कम करणारी अमेरिकाही आपल्याला शस्त्रे देतेच. कोणताही देश  फूकट मदत करत नाही. मदतीमागे स्वार्थ हा असतोच. हा सगळा धोरणी व्यवहार असतो.  भारत युध्दाच्या विरोधात असतो. शांतीने प्रश्न सोडवता येतात, या विचारांचा आहे. मग रशिया याच विचारांच्या मुळावर घाव घालत असेल तर असला मित्र आपण जपावा का ? हा प्रश्न आज उपस्थित केला पाहिजे. जग फार मोठे आहे. हे जग जर काही तत्त्वावर चालावे असे वाटत असेल तर  रशियासारख्या युध्दप्रिय देशांबरोबर मैत्री कायम ठेवावी का ? याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. एकमेकांच्या राजकीय गरजांपूरते एकमेकांना समर्थन करणे, हे मैत्रीच्या तत्त्वात बसत नाही. मैत्रीला सम विचारांचा पाया असावा लागतो.  तेव्हाच कुठे ही मैत्री निष्कलंक आणि अधिक भक्कम ठरू शकते. भारताच्या लोकशाही विचारांशी फारकत घेणारे आजचे रशियन सरकार आहे. व्लादिमिर पुतीन हे एक नंबरचे हुकुमशाह आहेत. रशियात त्यांची हिटलरशाहीच सुरू आहे. ज्या जर्मन हुकूमशाह हिटलरशी रशियातील सैनिक व सामान्य माणूसही लढला त्याच रशियात हिटलरचेच प्रतिरूप शासन करतोय.

            जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला लोकशाहीच्या मुल्यांना जपताना युक्रेन-रशिया युध्द रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करायला पाहिजे होते. ते तर झाले नाहितच उलट आपले विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याने यांना मायदेशी परत आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारत सरकार यांना सुरक्षित आणेलही, पण ही कार्रवाई लवकर झाली असती तर या मुलांना आपले जीव मुठीत घेऊन बंकर मध्ये तर कोणाला कुठल्या शेल्टरमध्ये दिवस काढावे लागले नसते. 

           २ मार्च रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत १४१ देशानी रशियाच्या विरोधात मतदान केले. फक्त ५ देशांनी रशियाची साथ दिली. भारताने मतदानच केले नाही. भारताला स्पष्टपणे युध्दाविरूध्द भूमिका घेता आली नाही, ही शोकांतिकाच आहे. विश्वगूरू होण्याची स्वप्ने पाहताना अशा मोक्याच्या ठिकाणी विचार व कृतीत खंबीरता असणे आवश्यक आहे, पण भारत-रशियाच्या मैत्री संबंधामुळे भारत आपला बाणा दाखवू शकला नाही. जी मैत्री बहुतेककरून आर्थिक स्वरूपाचीच आहे.  संयुक्त राष्ट्र संघटनेत स्थायी सभासदत्व मिळावे यासाठी  पाठिंबा रशियाने नेहमीच दिला आहे. हे सोडून आर्थिक स्तरावरच सगळा व्यवहार चालतो. बदलत्या जागतिक परिस्थितीला समोर ठेवून मूळ भारतीय ध्येयांना वजा न करता नवीन धोरणांना आत्मसात करावे लागेल. आपले विचारवंत म्हणू शकतात की भारत पाकिस्तान यांच्या वादात रशिया भारताची बाजू घेतो तर आपणही रशियाची बाजू घेतली पाहिजे. युक्रेन आणि पाकिस्तान यांच्यात कसलीच तुलना होऊ शकत नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसणारा देश आहे. तो संपूर्ण जगासाठीच धोकादायक आहे. युक्रेन तसे काही करत नाही. किंवा रशियाला अस्थिर करण्याची कुठलिही कृती युक्रेनद्वारे होत नाही. असे असताना भारताची भूमिका माणूसकीला वाचवण्याची असली पाहिजे. ती आहे सुध्दा. पण मैत्रीखातर तिचा लोप होणे संयुक्तिक नाही. 

डॉ. अरुण लाडे

दि. ३ मार्च २०२२ 

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....