स्वामी विवेकानंद यांचे गौतम बुध्दांविषयीचे विचार

 स्वामी विवेकानंद यांचे गौतम बुध्दांविषयीचे विचार

         

       स्वामी विवेकानंद म्हटले की धर्म आणि धर्माभिमान असा अर्थ आपल्या डोळ्यापुढे उभा ठाकतो. असा संकुचित विचार निर्माण होण्यामागे अर्थातच तथाकथित तत्वचिंतक, विचारवंत, एकांगवादी धार्मिक अंध भक्त यांचा हात आहे. यांच्या साचेबध्द वैचारिक प्रसारामुळे खरे स्वामी विवेकानंद आम्हाला कळलेच नाही वा कळू दिले नाही. खऱ्या  सनातन धर्माचा प्रचार-प्रसार हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असताना स्वामी विवेकानंदांच्या विचारांची सत्यता मात्र भारतीय समाजात पोहोचू शकली नाही, हे त्यांचे आणि आमचेही दुर्दैवच म्हणावे लागेल. आपापल्या सोईने भारतीय धर्मांच्या विचारांचे अपभ्रंश अनुयायांमार्फतच होत राहिले आहे. आपणांस पटेल, रुचेल ते प्रिय. त्याचेच अनुकरण करायचे. मग जरी आपल्या खऱ्या धर्मात नसेल तरी ते समर्थनीय ठरते. पुढे त्याच गोष्टी धर्माचा भाग बनत गेल्या. 'जतो मत, ततो पथ' म्हणजेच सर्वच धर्ममत ईश्वराप्रत पोहोचतात, अशी रामकृष्ण परमहंसांनी धर्माची व्याख्या केली होती.  स्वामी विवेकानंद यांनी
या विचारांचा अधिक विस्तार व प्रसार केला.  स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या धर्मवेत्त्यानी खरा सनातन धर्म उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. धर्म आणि चमत्कार यांचा परस्पर संबंध जोडला जातो. स्वामी विवेकानंद हे अशा सिध्दींचा नेहमीच विरोध केला. यामागे त्यांचे गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांची विशाल दृष्टी होती.
                स्वामी विवेकानंद हे अस्सल धर्मनिरपेक्ष संन्यासी होते. त्यांना बौध्द धम्म आणि गौतम बुध्दांविषयी अपार श्रध्दा होती. स्वामी आपली संपूर्ण हयात धर्म प्रसारात व्यतीत केली. अनेक देशांमध्ये त्यांचा शिष्यवर्ग व चाहते पसरलेले होते. त्यापैकीच एक ओकाकुरा काकुझो. १९०२ मध्ये ओकाकुरा हे जपानमध्ये धर्ममहासभा ओयोजित करणार होते. त्या सभेचे निमंत्रण द्यायला ते स्वतः भारतात स्वामींकडे आले होते. त्यांनी स्वामींना बुध्दगयेस येण्याची विनंती केली. स्वामी विवेकानंदांनी त्वरीत होकार दिला. बुध्दगया आणि वाराणसी या दोन स्थळांविषयी स्वामींच्या मनात जी आपुलकी आणि श्रध्दा होती ती पुढील वक्तव्यातून आपणास कळेल. ते ओकाकुरा यांना म्हणाले, "तथागतानं जेथे निर्वाणपद प्राप्त केले तेथे आपल्या सोबत जाणं मला फार आवडेल. तिथून वाराणसीची यात्रा करू, तिथं मानवाला गौतमानं पहिला उपदेश दिला."  हा काळ स्वामींच्या आयुष्याच्या शेवटासमीपचा काळ होता. ते प्रकृतीने फारच खालावले होते, पण एका अनामिक ओढीने त्यांनी ती यात्रा पूर्ण केली. ही यात्रा स्वामींच्या आयुष्यातील शेवटची यात्रा होती. आपल्या भारतीय सत्य धर्माचा प्रसार करणाऱ्या स्वामींच्या तिर्थाटनाचा शेवट बुध्दगयेच्या प्रवासाने झाला. ही महान घटना, ऐतिहासिक क्षण आपण समजलोच नाही. येथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी ती म्हणजे, जीवनातील पहिली तीर्थयात्रा बुध्दगयेलाच केली होती. त्या तीर्थयात्रेने स्वामींना सत्यदृष्टी प्रदान केली.
गौतम बुध्दांचा स्वामींवरील प्रभाव
                  स्वामींचे बालपण हे गौतम बुध्दांच्या विचाराने प्रेरीत होते. बुध्द हे त्यांचे आदर्श होते. प्रेम आणि परोपकाराची शिकवण देणारे बुध्द बाल नरेंद्रचे सर्वस्व झाले होते. पुढे त्यांचा रामकृष्ण परमहंस यांच्याशी गाठ पडली वा ते परमहंसांचे शिष्य झाले. तसे असतानाही बुध्दांचा प्रभाव मात्र कायम होता. मठातील इतर गुरुबंधूंना ते तासन् तास बुध्दांविषयी सांगत असत. बुध्दाने ज्ञानप्राप्त करण्यासाठी ज्याप्रमाणे,  "जोपर्यंत मला आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत मी जागेवरून हलणार नाही"  असा संकल्प केला तसाच स्वामी विवेकानंदांनीही बोध्दीवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. एप्रिल १८८६ मध्ये बुध्दगयेची यात्रा आटोपून ते मठात परतले. गुरु-शिष्यांनी बुध्दांच्या विचारांवर बरीच चर्चा केली. 'बोधाशी जो एकरूप झाला तो बुध्द' हे परामहंसांनी स्वामींना स्पष्ट केले.
              स्वामीजींच्या संपूर्ण आयुष्यावरच बुध्दांचे फार मोठे प्रभाव असल्याचे त्यांच्या चरीत्रातून स्पष्ट जाणवते. बालपणापासून ते संन्यास धर्माचा स्विकार व पुढे जागतिक स्तरावरील धर्म प्रसार, धर्मसभा प्रत्येक वेळी गौतम बुध्द त्यांच्या सोबत होते. धर्ममहाभेतील गौतम बुध्दांवरील त्यांचे भाषण बरेच काही स्पष्ट करणारे आहे. "आध्यात्मिक तत्वांचा समाजपुरुषावर होणाऱ्या नैसर्गिक प्रभावाचा अन्वयार्थ बुध्दानं लावला. हिंदू धर्माचं पूर्णत्वाप्रत पोहोचविणारं तार्किक विवेचन बुध्दानं केलं. हिंदू व बौध्द धर्म एकमेकांशिवाय जगू-नांदू शकणार नाहीत. कारण ऋषी-मुनींची मेधा आणि गौतमाचा सेवाभाव या दोहोंचीही आज भारताला गरज आहे. धर्मप्रसारासाठी देश सोडून जगभर हिंडण्याची आकांक्षा बाळगारा गौतम हा दुनियेचा पहिला मिशनरी होय" स्वामींचा गौतम बुध्दांबद्दल असणारा निस्सिम श्रध्दाभाव पुढील एका प्रसंगातून व्यक्त होतो. भगिनी निवेदीताला  दिक्षा दिल्यावर स्वामींनी,"ही फुलं घे, ज्यानं आपलं सारं जीवन जनसेवेसाठी वाहिलं होतं, त्या बुध्दाच्या चरणांवर ही फुलं वहा." गौतम बुध्दांच्या सत्यान्वेषी विचारांमध्ये स्वामी विवेकानंद यांचे विचार एकरूप झाले होते. वसंत पोतदार लिहितात, "बुध्दानं सिध्दी, चमत्कार तर सोडाच, मोक्ष अथवा निर्वाणीचीही फिकीर केली नाही आणि प्रेम, दया, सेवा, अहिंसा यांच्यासाठी बलिप्रदत्त होऊन लोकसेवेत आयुष्य वेचलं. मरणोन्मुखी असतानाही लोकजागरणाचा हव्यास धराला. यामुळेच स्वामी विवेकानंद त्यांचे निस्सीम भक्त झाले." यावरून हेच स्पष्ट होते की, स्वामी विवेकानंद हे सत्य आणि सेवाभाव या मुल्यांवर प्रेम करणारे संन्यासी होते. बौध्द धम्म एक वेगळा धम्म आहे, म्हणून त्याचा विरोध करायचा, अशा कोत्या विचारांचे ते कदापि नव्हते. उलट ते बुध्दांच्या जीवनकार्याशी समरस होऊन आपले धार्मिक कार्य पूर्ण केले. जगाच्या इतिहासात असे व्यक्तीमत्व अजून तरी अस्तित्वात आलेले दिसत नाही. अनेक परदेशी जनतेला तर स्वामी विवेकानंद हे बुध्दांसारखेच दिसतात. यासंदर्भात वसंत पोतदार आपल्या पुस्तकात उल्लेख करतात, " जमशेदजी टाटांनी एकदा भगिनी निवेदितांना सांगितलं होत, जपानमध्ये सर्वत्र सामींना पाहून पादचारी धक्का बसल्यासारखे थांबत, खूप लवून अभिवादन करीत आणि पुढं जात. याचं कारण नंतर कळलं. जपानी बौद्ध जनता स्वामींना साक्षात गौतम बुध्दच मानी." दुसऱ्या  एका प्रसंगात तर, एका पाश्चिमात्य महिलेने स्वामींना, तुम्ही गौतम बुध्द होऊन पुन्हा अवतरला आहात का ? असेही विचारले होते. इंग्लंडच्या एका वृत्तपत्रात तर, स्वामी विवेकानंद हे गौतम बुध्दांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारे संन्यासी, असे छापले होते. काहींच्या मते स्वामींचे वरीलप्रमाणे बुध्दांशी साम्य आढळते. हे व्यक्तीपरत्वे वेगळेही ठरू शकते, पण वैचारिकदृष्ट्या ते बुध्दांच्या अधिक जवळ जाणारे हिंदू संन्यासी होते, हे मात्र निश्चित.
                एकदा त्यांनी अशी टिप्पणी केली की, जर मी बुद्धाच्या काळात असतो तर आपल्या अश्रूंनी नव्हे तर अंत:करणाच्या रक्ताने बुध्दाचे पाय धुतले असते. हा किती थोर श्रध्दाभाव आहे.
              स्वामी विवेकानंद गौतम बुध्दांच्या प्राणी दयेबद्दल म्हणाले होते,  "तो (बुद्ध) एकमेव माणूस होता जो यज्ञ थांबविण्यासाठी प्राण्यांसाठी आपला जीव देण्यास सदैव तयार होता. एकदा तो राजाला म्हणाला, “कोकरूचा यज्ञ तुम्हाला स्वर्गात जाण्यास मदत करत असेल तर एखाद्या माणसाला यज्ञ केल्याने तुला मदत होईल; तर मला यज्ञ कर.” राजा आश्चर्यचकित झाला.  हा मनुष्य कोणत्याही हेतूशिवाय समर्थ होता. तो सक्रिय प्रकाराच्या परिपूर्णतेच्या रूपात उभा आहे.  त्याने जी उंची गाठली आहे ते दर्शविते की कामाच्या सामर्थ्याने आपण देखील सर्वोच्च अध्यात्म मिळवू शकतो." बुध्दाचा हा विचार  स्वामी विवेकानंद यांना अनेकवेळी मार्गदर्शक ठरला. आयुष्यात त्यांनी आपल्या कर्तव्याला अधिक महत्त्व दिले.  
                स्वामी विवेकानंद हे स्पष्टवक्ता होते. जे सत्य आणि योग्य आहे ते सांगायला वा करायला ते कधीही मागेपुढे पाहिले नाही. स्वामी विवेकानंदानी जाती - धर्म असा भेद केला नाही. याबद्दल त्यांचे विचार किती प्रखर होते हे त्यांच्या पुढील विधानावरून स्पष्ट होईल. एकदा खेत्री संस्थानचे दिवाण जगमोहण स्वामीजींना भेटायला आले असताना आपले मत व्यक्त केले, "काय हे स्वामी? मुसलमानाकडे राहता, जेवता ? तुमच्या ताटाला चुकून म्लेंछाचा हात लागत असेल. अहो, हिंदु संन्यासी तुम्ही !" त्यावर स्वामीजी रागातच म्हणाले, " अहो, मी संन्यासी आहे. फक्त संन्यासी. तुमच्या हिंदू रूढींपासून अगदी मुक्त. मी भंग्यासोबत आरामात जेवू शकतो. मला ईश्वराची भीती नाही, ना वेद आणि अन्य शास्त्रांचं भय. मला भीती आहे फक्त तुम्हा उच्चवर्णीय हिंदूंची. कारण तुम्ही ईश्वरालाही ओळखलं नाही आहे आणि वेदही जाणले नाही आहेत." स्वामी विवेकानंद यांचे हे धर्मनिरपेक्ष विचार हिंदू धर्माची उंची वाढवणारेच आहेत. खऱ्या हिंदू धर्माच्या विचार संस्कृतीचा प्रसार करताना त्यांनी इतर धर्म व धर्मीयांचा नेहमीच मान राखला. असा संन्यासी हिंदू धर्मात तरी आजपर्यंत झालेला दिसत नाही.
                  स्वामी विवेकानंद यांनी हिंदू, मुस्लिम, जैन, बौध्द आणि ख्रिस्ती धर्माच्या अनेक  पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. मुंबई जवळ असलेल्या कान्हेरी लेण्यांना पाहून ते खूप प्रभावित झाले. त्यांची अमेरिकन शिष्या भगिनी ख्रिष्टीन यांनी याबद्दल  सांगितले आहे. त्या १०९ गुंफांमध्ये भिक्खू राहत. काळाच्या ओघात ते स्थळ विस्मृतीत गेले होते. स्वामींना या लेण्यांचा शोध लागला तेव्हा या बेटावर आपल्या कार्याचं केन्द्र निर्माण व्हावं, अशी स्वामीजींची योजना होती.  बौध्द धर्माचा  स्वामी विवेकानंद यांना जागोजागी असा अनुभव येत होता. बौध्द धम्म व गौतम बुध्द यांच्याविषयी त्यांना अपार सहानुभूती आणि आदर होते. धर्मसभेला अमेरिकेत गेले असताना,"बुध्ददेवांनी ज्याप्रमाणे पौर्वात्यांना संदेश दिला, त्याप्रमाणे मी पाश्चात्यांसाठी संदेश आणला," असे भाष्य केले होते. येथेही त्यांचापुढे गौतम बुध्दांचाच आदर्श होता.
               स्वामी विवेकानंद अमेरिकेतील वास्तव्यात 'बौध्द आणि हिंदू धर्म' यावरही भाषण केले होते. बौध्द धर्म म्हणजे हिंदू  धर्माचाच विकास होय, असे ते संबोधतात. याचप्रसंगी उपस्थित बौध्दांना उद्देशून  स्वामी विवेकानंद म्हणतात की, "आपल्यामधील विभक्तपणाच्या परिणामावरून आपण हाच धडा घेतला पाहिजे की, ब्राम्हणांच्या बुध्दीच्या नि तत्वज्ञानाच्या साहाय्याखेरीज तुम्ही लोक टिकू शकणार नाही आणि आम्हीही बौध्दांच्या विशाल हृदयाविना जगू शकणार नाही. बौध्द आणि ब्राम्हण यांच्यातील विभक्तपणाच भारताच्या अवनतीचं कारण होय." पुढे ते ब्राम्हणांंची बुध्दीमत्ता व बुध्दांचे विशाल हृदय, त्यांच्या  असाधारण लोककल्याणकारी शक्तींचा आपण मिलाफ घडवून आणायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करतात.
                अमेरिकेतील 'स्टेलन लिक्कम लेक्चर ब्युरो'  या संस्थेद्वारे स्वामी विवेकानंदांचे काही भाषणांचे कार्यक्रम आयोजित केले होते. यातील एका भाषणात ते म्हणाले, "लक्षात ठेवा, जगातला जो पहिला मिशनरी होता त्यानं अर्धी दुनिया आपल्या वैचारिक ताकदीनं प्रेरित केली, रक्ताचा एक बिंदूही न सांडता मतपरिवर्तन केलं. त्याचं नाव गौतम, गौतम बुध्द ! आणि तुम्ही ? तुम्ही तरवारींच्या पात्यांच्या जोरावर, संगिनींच्या टोकाच्या बळावर, धर्मांतर करू चाहता आहात. पण ते अशक्य आहे ! तुम्ही मला एक उदाहरण दाखवा. दोन सुध्दा नको, एकच असं उदाहरण जेथे रक्तपाताविना तुम्ही धर्माचा प्रसार केलाय आणि तरीही तुम्ही अशा किती लोकसंख्येला बाटवू शकलात हो ? दुनियेतली प्रत्येक सहावी व्यक्ती चीनी म्हणजेच बौद्ध आहे. चीनखेरीज जपान, तिबेट, रशिया, सायबेरिया, सयाम, ब्रम्हदेश आहे हेही विसरू नका." बुध्द आणि बौध्द धम्माविषयी त्यांच्या मनातील आस्था अशाप्रकारे अनेकदा प्रकट होत असे.  स्वामी विवेकानंद यांच्या संपूर्ण आयुष्यावर बुध्दाचा प्रभाव होता. बुध्दाची करुणा स्वामी विवेकानंद यांच्यात वास करत होती. भारत देशातील उपाशी पोटी असलेल्या जनतेला धर्माची नव्हे तर अन्नाची गरज आहे, हा त्यांचा विचार याच करुणेतून जन्मला आहे. 

🖋️डॉ. अरुण व्ही. लाडे 

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....