हिटलर....कसा घडला आणि बिघडला ? (भाग ३)

            हिटलर याने जे भोगले ते व्यक्तीमत्वाला धारदार बनवणारे होते.  त्याने गरीबीचे चटके सहन केले, रागीट वडीलांचा त्रासही भोगला. आईचा आजार जवळून पाहताना तो अधिक हळवाही झाला. पोरकेपण त्याच्या वाट्याला आले. या सगळ्या प्रसंगांना तो एकट्याने सामोरे गेला. या सर्वांचा परिणाम त्याच्या व्यक्तीमत्वावर झाला. तो अधिक कठोर झाला.
             त्याच्या वागण्याला कसलीच मर्यादा नव्हती. त्याचा कुणी विरोध केला तर त्याला सहन होत नसे. त्याला जे अनुभव आले, त्यातून तो आपले विचार, दृष्टिकोन ठरवू लागला. त्याच दृष्टिकोनातून तो इतरांकडे पाहू लागला. पुढील व्यक्ती जर त्याचा विरोधी असला तर त्याला खाऊ की गीळू असे त्याचे झाले होते. आपलेच खरे, असे एकदा ठरवले तर दुसऱ्यांचे म्हणणे कितीही योग्य असले तरी ते आपल्यासाठी अयोग्यच असते. अॕडाॕल्फ हिटलरचेही नेमके तसेच झाले होते. तो स्वतःच्याच खास नजरेतून जगाला पाहत होता.

ज्यूंचा विरोध
               हिटलरला वाचनाचा नादच होता. जर्मन इतिहासासोबतच अनेक विचारवंतांची पुस्तके तो सारखा वाचत राही. वाचन आणि प्रत्यक्ष वास्तव, या दोन्ही घटकांनी मिळून त्याचे विचार घडलेत. वंशवाद तथा राष्ट्रवाद हे त्याचेच फलित. साम्यवादाचा त्याला फार तिटकारा होता. या सर्वांत त्याचे ज्यूविरोधी विचार भयंकर होते. वंशवादाने पछाडलेल्या हिटलरने ज्यूंची बेमुर्वतपणे कत्तल केली. भारतात जसे परशुरामाने क्षत्रियांचा संपूर्ण नायनाट करण्याचा प्रण केला होता. हिटलरचेही ज्यूंबद्दल तसेच विचार होते. त्याने आंधळ्या वंशवादापायी ज्यूंवर अतोनात अत्याचार केले. हे सगळे त्याच्या मानसिक विकृतीचेच द्योतक होते, असे म्हणावे लागेल. आपल्या देशाला नव्या उर्मीची व धाडसाची गरज असून यात ज्यू हे अडथळा आहेत, अशी हिटलरची धारणा होती. पहिल्या महायुध्दात भाग घेतलेल्या हिटलरला अधिकाऱ्यांमधील युध्द विषयक औदासिन्यतेचा अनुभव आला. याबाबतीत त्याने ज्यूंनाच दोषी धरले. देशात असंतोष पसरवणारे ज्यूच आहेत, असे त्याचे मत होते.

                ज्यू हे उदार व्यक्तीमत्वाचे लोक होते. त्यांचेही इतरांएवढेच जर्मनीवर प्रेम होते. ते स्वतःला जर्मनच समजत. शतकानुशतकं जर्मनीत राहणारे ते धर्माने ज्यू होते. पूर्णतः जर्मनीच्या समाज व संस्कृतीशी एकजीव झालेल्या अनेक ज्यूंचे विवाह इतर धर्मियांशी झाले होते. जर्मनीच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्यांपैकी काही ज्यू साम्यवादी होते. बहुतेक ज्यू जर्मन सम्राट विल्हेल्म यांचे कट्टर समर्थक होते. ज्यूंचा हिटलरलाही विरोध नव्हता, पण साम्यवादाचा विरोध करून त्याअंतर्गत ज्यूंचा नाझींनी अनन्वीत छळ केला. मवाळ असणाऱ्या जर्मन ज्यूंनी पहिल्या महायुद्धात भाग घेऊन जर्मनीची सेवा केली होती. जर्मनीचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, पण हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने त्यांना गॕस चेंबरमध्ये कोंडून मारलं. राष्ट्रभक्त असणाऱ्या ज्यूंबद्दल हिटलरला एवढा तिरस्कार होता की त्याला ज्यूंचे राष्ट्रप्रेम दिसलेच नाही. हे ज्यू वंशाचे लोक जर्मनीचे शत्रूच आहेत, अशी त्याची ठाम समजूत होती. त्यानुसार हिटलरने ज्यूंचे सर्व अधिकार संपुष्टात आणले. बहूतेक ज्यूंना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. आता नवीन कायद्यानुसार नोकरीसाठी आर्य वंशाचे उमेदवारच पात्र ठरणार होते. शाळा, दवाखाने, कारखाने इ. सर्व क्षेत्रातील ज्यूंवर निर्बंध लावले गेले. सांस्कृतिक, मनोरंजन, साहित्यक्षेत्र अशा साऱ्याच क्षेत्रात ज्यूंना बहिष्काराला सामोरे जावे लागले. ज्यूंवरील अत्याचार अमानवीयच होता. ज्यूंपासून जर्मनीला व हिटलरला धोका आहे, ते दूश्मनांना आपली माहिती देतील, ही हिटलरला शंका होती. म्हणून ज्यूंच्या प्रत्येक हालचालील नाझींच्या गुप्तहेरांची करडी नजर असायची. छोट्याश्या शंकेवरूनही ज्यू नागरिकांना कैद करून गॕस चेंबरमध्ये टाकले जायचे. जर्मनीत १९३३ पासून संपूर्णतः हिटलर युग सुरू झाले होते. स्वकेंद्रीत राजकारण करतानाच राष्ट्राभिमानाला आवाहन करून जर्मनीला पुढे नेण्याचे हिटलरचे धोरण होते. यात मात्र बुध्दीवाद्यांना स्थान नव्हते. जर्मनीत ज्यू बुध्दीवाद्यांची खूप मोठी परंपरा होती. ती हिटलरने खंडीत केली. जर्मनीला आंतरराष्ट्रीयस्तरावर सर्वोच्च बनवण्यासाठी रुढ शिक्षण पध्दतीला फाटा देऊन हिटलर नव्या स्वप्नांची रुजवणूक करू पाहत होता. हिटलरच्या तेजापुढे बौद्धिक तेज फिके पडू लागले होते.

सैनिक हिटलर
                 हिटलर आणि व्हिएना यांचा फार संबंध आहे. त्याची वैचारिक जडण घडण येथेच झाली. असे असले तरी येथे त्याला कायमचे राहायचे नव्हते. आस्ट्रीयाच्या नियमानुसार सैनिकात भरती होणे बंधनकारक होते. पण हिटलरच्या मनात आस्ट्रीयन साम्राज्याबद्दल तिरस्कार होता. त्याला या साम्राज्यात सैनिक म्हणून भरती व्हायचं नव्हतं. त्याने वयाच्या चोवीसाव्या वर्षी व्हिएना सोडले. तो १९१३ मध्ये जर्मनीत परतला. तो म्युनिच येथे वास्तव्याला होता. शेवटी आस्ट्रीयन सरकारला एक वर्षानंतर त्याची खबर लागलीच. सैन्य भरती त्याने टाळली होती. आपल्याला तुरुंगवास होईल, या भीतीने त्याने आस्ट्रीयन सेनाधिकाऱ्यास पत्र लिहिले. पत्रात क्षमायाचना केली. त्याच्यावर आलेल्या संकटांचा, दुःखाचा ओघवत्या शैलीत वर्णन केले. परिणामतः आस्ट्रीयन सेनाधिकारी प्रभावित होऊन सैन्य भरतीपासून त्याला मुक्त केले. पुढे १ आगस्ट १९१४ रोजी जर्मनीने युध्द पुकारले. हिटलर जर्मन सैनिकात भरती झाला. पितृभूमी असलेल्या जर्मनीसाठी लढायला तो आता तयार होता. त्याला फार आनंद झाला.

              पहिल्या महायुध्दात हिटलर एक सैनिक म्हणून सहभागी झाला होता. तो धाडसी सैनिक होता. मरायला तो घाबरत नव्हता. युध्दात अनेकदा तो थोडक्यात बचावला. युध्द प्रसंगीही त्याने चित्रकारीतेची आवड जपली होती. फावल्या वेळेत युध्द चित्रे काढीत असे. युध्दात कधीही सुट्टी न घेणाऱ्या ॲडाॕल्फला एकटेपणा आवडायचा. या युध्दात तो जखमी झाला.



हिटलर - सनकी की मनकी
               हिटलर संबंधी अनेक समज रूढ आहेत. आपल्या मनासारखे झाले नाही तर तो संबंधितास कायमचा संपवायचा. देशाभिमान हा असलाच पाहिजे, पण इतरांविषयी दुराभिमान असेल तर ते देशविघातच ठरू शकते. हे हिटलरच्या बाबतीत घडले. देशाला विकासाच्या उंच शिखरावर नेताना तुम्ही मार्ग कोणता निवडता, यालाही फार महत्त्व असते. समर्थन व विरोध या दोन्ही बाजूंचा विचार केला तर धोरण तयार करण्यात अचूकता येते. एकांगी विचाराला परतीची वाट नसते. जर्मनीला खूप अंतरापर्यंत घेऊन गेलेल्या हिटलरला परत फिरताच आले नाही. त्यातच त्याचा अंत झाला.

                जर्मनीत आधुनिकतेचे वारे वाहू लागले होते. जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे जर्मनांच्या मनात बिंबवण्यात हिटलर यशस्वी झाला. पहिल्या महायुद्धात जर्मनीवर अनेकविध अटी लादल्या गेल्या होत्या. त्या पाळणे जर्मनीला बंधनकारक होते, पण हिटलरला हे मान्य नव्हते. १६ मार्च १९३६ रोजी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत हिटलरने जर्मन सेनेत नव्याने सैनिकभरती सुरू केली जाईल, असा प्यूररच्या वतीने निर्णय जाहीर केला. हा व्हर्सायच्या तहाचा उल्लंघन होता. अनेकांना वाटत होते की, याचा परिणाम म्हणजे फ्रान्स जर्मनीवर आक्रमण करेल, पण हिटलरचा मुत्सदीपणा यशस्वी झाला. फ्रान्सने काहीच हालचाल केली नाही. हिटलरला याची कल्पना होती, कारण फ्रान्समध्ये सुरू असलेल्या राजकीय समस्यांमुळे तथा इंग्लंडही आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे हे दोन्ही देश कोणतीही कारवाई करणार नाही याची त्याला खात्री होती. ती खरी ठरली. सोबतच लोकशाहीवादी राष्ट्रांना दिलासा देण्यासाठी हिटलरने अनेक आश्वासने दिली. जर्मन कोणत्याही देशावर आक्रमण करणार नाही, या प्रमुख आश्वासनासह जर्मनीला शांती हवी आहे, तहांचे पालन केले जाईल, अशा प्रकारचा तेरा कलमी कार्यक्रम त्याने जगापुढे ठेवला. यावर अनेकांनी विश्वास ठेवला. हिटलर आता कुटनीतीमध्ये निपून होत चालला होता. सोबत वाढत जाणारी जर्मन सेनेची ताकद आणि जनतेचा पाठिंबा होताच. साहजिकच हिटलरचा आत्मविश्वास दुनावला.

                हिटलर आपल्या आलीशान बर्चेसगार्डनमध्ये विचारमंथन करीत असे. तिथे केलेला विचारांचा कूट तो अचानकपणे निर्णयाच्या रुपात जर्मनी व जगापुढे मांडत असे. हिटलरच्या महत्वपूर्ण व आकर्षित योजना विशेषतः शनिवार या दिवशी प्रसिध्द होत. अशा अचानक झालेल्या निर्णयामुळे अनेकांवर आश्चर्यचकित होण्याची पाळी येई. हिटलर अनेकदा चुकायचा. बोलण्यात, निर्णय घेण्यात; पण त्याच्याकडे वक्तृत्वाचे जबरदस्त कौशल्य असल्याने, त्याद्वारे तो आपले म्हणणे पटवून द्यायचा. अगदी आपले चुकीचे निर्णयही. क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....