थ्यँक यु JAIPAN !
तब्बल अठरा वर्षानंतर तिची साथ सोडावी लागली. काही काळ घरचे वातावरण थोडेसे दुःखी, थोडेसे हळवे झाले. तिने अनेक आनंदाच्या प्रसंगी आम्हाला भक्कम साथ दिली. आपल्या गोड आवाजात घरात आनंद पसरला. तिनेच प्रत्येक रविवार खास केला. तिच्याच साक्षीने अनेक सणं, निमित्त साजरी झालीत. आज तिची जागा सुजाता घेत आहे. दुःख-आनंद असा हा प्रसंग आहे. तिच्या प्रदीर्घ सेवेबद्ददल मनापासून आभार! थँक यु जेपान द मिक्सर!
होय, मी Jaipan Mixer विषयी बोलत आहे. अठरा वर्षापूर्वी ती आमच्या घरात वाजत गाजत आली. २३ मे २००४ मध्ये माझ्या लग्नात पत्नीच्या एका जवळच्या नातेवाईकाने आंदन स्वरूपात तिला भेट (माझ्याकडील नातेवाईकांनी ताट, गंज, स्टीलचा डबा तत्सम वस्तूच भेट स्वरूपात दिल्या. त्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे.) दिली. हळुवार तीने स्वयंपाकघरात आपले बस्तान बसवले. किरायाची खोली ते स्वतःचा घर अशा प्रवासात ती आमच्या सोबत कायम राहिली. जेव्हा आम्ही घर बांधायला सुरूवात केली तेव्हाच माझ्या पत्नीने स्पष्ट केले होते, "किचन, मला हवी तशी बांधा. बेडरूम लहान झाली तरी चालेल, पण किचन प्रशस्त हवी." तिच्या भावना अती महत्वाच्या होत्या. तिच्या म्हणण्यानुसार करायचा प्रयत्न केला. सुरूवातीला आर्थिक ओढातानीत घर बांधकाम पार पडले. किचन आणि घरची स्त्री यांचे नाते फार भावनिक असते. याची जाणीव आपण सर्वांना असेलच. स्वयंपाक घरातूनच कळते की आज 'या' घरचा वातावरण कसा आहे ? भांड्यांच्या नेहमीच्या आवाजापेक्षा थोडे जरी वाढले तरी पत्नीची मनःस्थिती कळते. असे हे स्वयंपाकघर आणि मिक्सर यांचेही नाते अतूट असेच आहे. पाटा, वरवंटा जाऊन मिक्सरने प्रत्येक स्वयंपाकघरात आपली खास जागा निर्माण केली आहे.
व्यक्ती असो वा यंत्र काही वर्षानंतर क्रियाशिलतेत फरक पडतोच. परिणामकारकता मंदावते. असेच काही आमच्या मिक्सरचेही झाले होते. काही दिवसांपासून तिचे वागणे बदलले. आवाजातही फरक पडला. मसालाही नीट होत नव्हता. ज्या मिक्सरने अनेक फळांचा रस, लस्सी, चटण्या अशा किती तरी खमंग पदार्थ आपल्या पाॕट मधून आम्हाला दिले. हल्ली ती रुसू लागली. मसाल्याचा पेस्ट व्हायला जास्तच वेळ होऊ लागला. एकदा तर तिचा सुरेख पिन साॕकेट मध्ये टाकताच घरची वीज बंद ( घरी ईन्वरटर आहे म्हणून बरे !)पडली. मी घराबाहेर, बाहेरगावी. आमच्या 'हि' ला प्रश्न पडला, सगळ्यांची लाईट आहे, आमची का नाही ? लहान मुलाने लाईट बद्दल शेजाऱ्याना विचारले. बाजुचे शेजारी येऊन बघतात तर एम.सी.बी. पडलेली. त्यांनी एम.सी.बी. वर केली. लाईट लखाकले. आमच्या हीने पुन्हा मिक्सर सुरू केले. मिक्सर सुरू करताच एम.सी.बी. पुन्हा पडली. हिने मग मिक्सर लावण्याचा नाद सोडला.
धुळीने माखलेल्या पाट्याला तिने धुवून लख्ख केले. कितीतरी वर्षांनी तो पाटा धन्य होऊन गडगडला. त्या दिवशी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. वरवंटा तर नाचू नाचू आपली करामत दाखवू लागला( अर्थात यात माझ्या पत्नीचेही कष्ट आहेत) तो मसाला जेव्हा फोडणीत पडला तेव्हा सारा आसमंत हरवलेला सुगंध घेऊन तृप्त झाला.
दुसऱ्या दिवशी तिला म्हणजे मिक्सरला दुरूस्तीकेंद्रात घेऊन गेलो. तज्ञ महाशयाने काही वेळातच तिला माझ्या सुपूर्द केले.
"काय झाले होते?" म्हनून त्यांना विचारलो तर ते म्हणाले,"विशेष असे काहीच नाही."
"मग, मिक्सर सुरू करताच, एम.सी.बी. का पडते?" माझा भाबडा प्रश्न.
"केबल शार्ट होने से ऐसा होता है. लेकीन इसमे ऐसा कुछ दिख तो नही रहा." त्याचा हीन्दीतून उत्तर.
काही दिवस जेपान मिक्सीने आपली सेवा सुरळीत सुरू ठेवली. एके दिवशी पुन्हा मिक्सी सुरू करताच एम.सी.बी. खाली. आमच्या हिने मग तिला फडक्याने छान पुसले. गोरे गोमटे तिचे रूप बघून तीही हरखली. मग अलगद उचलून स्टोर रूममध्ये ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ जानेवारी ला घरी छोटेखानी कार्यक्रम. आमची प्रिय मिक्सी अशी स्टोर रूममध्ये बंद पडलेली. मला वाटले, कॕटरींगवाले मिक्सी आणतील तर बरे होईल. कार्यक्रमाच्या दिवशी त्यांनी मिक्सर मागितला. तेव्हा मला काही सुचेना. काय करावे ? घरी कार्यक्रम, स्वयंपाक करणारे वाट पाहताहेत, घरची मिक्सी बंद....
निमित्त होता, चला नवी सुरूवात करूया! असा विचार केला आणि तडक भांड्याच्या दुकानात गेलो. ज्या Jaipan Mixer ने एवढा दिर्घ काळ आमच्या स्वयंपाकघरात व्यतीत केला, आता तिची जागा कोणाला द्यावी?हा प्रश्न घेऊन मिक्सर बद्दल चौकशी केली.
शाॕप किपरला सांगितलं, जेपानचीच मिक्सी दाखव! त्याने दाखवली, पण आमच्याकडे असलेल्या jaipan मिक्सीची सर तिला काही आली नाही. ती दणकट, सुरेख अशी मिक्सी आणि आता माझ्यापुढे असलेली ही jaipanचीच पण आता बनलेली स्लीम आणि हाडकी (ज्या घरी jaipan ची mixer आहे त्यांची माफी मागतो. होऊ शकते त्या दुकानात jaipan mixer ची व्हेरायटी नसावी.) मिक्सी होती. ती काही मला आवडली नाही. दुकानात येताना स्वयंपाकवाल्या मावशीने, 'घेत असाल तर सुजाता घ्या," असा सल्ला दिला होता. माझ्या डोक्यात jaipanच होतं, पण या नव्या यंत्राचा दर्जा बघता, त्या भावाला सुजाता मिक्सर दाखवायला सांगितलं. त्याने मोठ्या डब्यातून मोठ्या सुजाताला बाहेर काढले. तिचे रुपडे पाहून ती डोक्यात भरली. किंमत नव्या jaipan मिक्सीपेक्षाही दुप्पट. शेवटी दुप्पट किंमत देऊन नव्या सुजाताला(मिक्सरला) घरी आणले. किंमत ऐकताच आमच्या 'हि'ने, "कशाला एवढी महाग आणली?" असा प्रश्न केलाच. मी तिकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. पण खरं सांगतो याच स्त्री स्वभावाने अनेक कुटुंबांची आर्थिक घडी नीट बसवली आहे.
स्वयंपाकवाल्या मावशीपुढे मिक्सीचा डबा ठेवला. मिक्सीला खुर्चीवर ठेवले. एका सहकारी ताईने पेस्ट करण्यासाठी पाॕटमध्ये मसाला टाकला. त्यावर लावायचा झाकन त्यांना सापडेचना. मीही बघितलो. शाॕप किपरने झाकन डब्यात न टाकताच मिक्सरचा डबा माझ्याकडे सुपूर्द केला. शेवटी त्या ताईने सुजाताच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी पाॕटवर साधी प्लेट ठेऊनच मसाला तयार केला.
आता सुजाताने दिर्घ कालावधी गाजवलेल्या jaipan मिक्सरची जागा घेतली. निसर्ग नियम सांगतो, एकाची जागा दुसरा घेतोच. येथे कोणीही कायम नाही. जे क्षण आपल्याकडे आहेत, त्यांचा सदुपयोग कसा होईल? यासाठी प्रयत्न केले तर आपली एक खास ओळख निर्माण होईल. Jaipan मिक्सीने तशी जागा माझ्या घरात व मनात निर्माण केली. नव्या जमानातल्या नव्या सुजातानेही तसे काही करावे, ही अपेक्षा आहे.
प्रा. डॉ. अरुण लाडे
दि. ११ जानेवारी २०२३
Comments
Post a Comment