लाॕकडाऊन आणि गच्ची

लाॕकडाऊन आणि गच्ची

             
संपूर्ण विश्वालाच जागच्या जागी थांबवून आपली घौडदौड सुरू ठेवणारा कोरोणा आज मानवजातीचा नंबर एकचा दुश्मन झालाय. मानवी आतंकवाद वगैरे याच्यापुढे काहीच नाही. सध्या जगात याचेच आतंक माजले आहे. अशा या कोरोना (कोवीड१९) विषाणूने सगळ्यांना घरात बंदिस्त करून टाकले आहे. सध्या या विषाणूवर सामाजिक अंतर हाच एकमेव जालीम उपाय आहे. परिणामतः लोकांना लाकडाऊनला सामोरे जावे लागले. लाकडाऊनचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे दिवासभरातील तोचतोपणा अधिक कंटाळवाणा होत आहे. असे असले तरी कामाच्या व्यापामुळे, व्यस्ततेमुळे जे करता येत नव्हते ते करता येत आहे. जवळ असूनही जे बघता येत नव्हते ते बघता येत आहे. संपूर्ण कुटुंबाला अख्खा दिवस एकत्र घालवता येणे शक्य होत आहे. अशा सकारात्मक बाबीही या लाकडाऊनमुळे जुळून आल्यात.



             गच्ची....जी सगळ्याच घरांची शान, पण दुर्लक्षित अशी जागा. आता ही गच्ची अधिक प्रिय झाली आहे. वर्षभरातून उन्हाळ्यात पापड, वड्या, चिप्स इ. वाळवण्यासाठी गच्चीवर जाणे व्हायचे. तर कधी वाळलेले कपडे आणायला. आता लाकडाऊनमुळे विणाकारण बाहेर जाणे बंदच, अगदी वाकींगलाही. अशावेळी गच्ची मदतीला धाऊन आली. मागे काही दिवसापुर्वी घराला पेंट केले होते. पण गच्चीच्या भिंती तशाच राहिल्या होत्या. पेंटही वाचला होता. मग सर्वात आधी गच्ची रंगवायला घेतली. सकाळचा दररोज अर्धाएक तास या कामी जाऊ लागला. कधी माझा मुलगा तर कधी मी तीला म्हणजे गच्चीला रंगवू लागलो. घरावर जाणे फार कमीच, त्यामुळे धूळ, रेतीचे कण पसरलेले. तेही झाडून काढले. अशाप्रकारे गच्चीला सुंदर रुप प्राप्त झाले. आता ती अधिक लोभसवाणी भासू लागली. अगदीच हिंदीत सांगायचे झाले तर *नयी नवेली दुल्हणच.*

               सकाळ अन् संध्याकाळ अधिक रमणीय झाली ती या गच्चीमुळे. आपण जेथे राहतो तो परिसर किती सुंदर आहे, हे गच्चीवरुनच कळले. गुलाबी हिरवळीसह सभोवतालचे दृश्य टिपता येत आहेत. दररोज पत्नी व मुलांसोबत व्यायाम याच गच्चीवर सुरू आहे. सांयकाळचा वेळ उत्साहात जात आहे. निसर्गातील अनेक दृश्य खरं तर या आधीही होतेच, पण निवांतपणे न्याहाळता आले नाही. निळ्या, निरभ्र आकाशात स्वच्चंदपणे उडणारे पक्षी निसर्गाच्या प्रेमात पाडताहेत. अस्ताला जाणारा सूर्य गुलाबी रंगाची जी उधळण करतो, त्याला तर जवाब नाही. काळ्या, पांढऱ्या, गुलाबी ढगात विविध रुप शोधताना मुलांनाही गंमत वाटते. त्यांना आकाशात कधी मासे तरंगताना दिसतात तर कधी जंगलातून पळणारे ससे, सांबर.

                व्यायाम आटोपले की मुलांसोबत गप्पागोष्टींत वेळ कसा निघून जातो, हे कळतच नाही. पृथ्वीच्या जन्मापासून तिच्या अंतकाळापर्यंत या चर्चा चालतात. माझा लहान मुलगा आपल्या भात्यातून एकेक प्रश्न बाहेर सोडत जातो. अशावेळी डीस्कवरी सायंस सारखा टिव्ही चॕनल धावून येतो. त्यावर बघीतलेल्या अनेक माहितीतून त्याची जिज्ञासा शमवण्याचा आम्ही सारे प्रयत्न करतो. गच्चीलाही आता या गप्पांची सवय झाली आहे. तीही अधिक प्रसन्नतेने आमचे स्वागत करते. सांझसमयी डोक्यावरचा चंद्र असो की गुलाबी क्षितीजावर अस्ताला जाणारा सूर्य, आता दररोज ते सोबत असतात. असूनही ते अनेकांच्यादृष्टीने नसण्यासारखे होते, आता त्यांच्या असण्याची जाणीव होऊ लागली आहे. हे सगळे लाकडाऊनमुळे घडले. बदललेल्या या परिस्थितीची गच्ची साक्षीदार आहे.

               अनेकांच्या प्रेमाची साक्षीदार असलेली गच्ची आज लाकडाऊनच्या काळातील जवळची मैत्रीण (गच्ची स्त्री लिंगी असल्याने मैत्रीण म्हणतोय, ज्यांना मित्र हवा असेल त्यांनी टेरेसवर जावे) झाली आहे. लखलखत्या ऊनातही ज्यांना गार वाटतं, ती ही गच्चीच. तिचे दर्शन झाले की गच्चीवर बाग फुलल्याचा भास व्हावा, सारे आसमंत कसे सुगंधी होऊन जावे, असा सदृश्य अनुभव एका विशिष्ट काळात बहुतेकांना (आम्हा कौलारू वाल्यांचे असे कुठले नशीब!) आला असेलच. आता ही गच्ची कुटुंबवत्सल झाली आहे. सकाळ-संध्याकाळ सहकुटूंब तिच्या भेटीला येत असल्याने तीही फार आनंदी आहे. अनेक गच्च्यांवर पक्ष्यांसह लहान मुलांचा किलबिलाट एका नवीन स्वरांना जन्म देत आहे. ही किमया कोरोनाने करून दाखवली. अवचित आलेला हा बंदिस्तपणा नकोसा झाला असला तरी आलेल्या परिस्थितीशी सकारात्मकपणे जुळवून घेतले तर गांभीर्य कमी होऊन जाते. गच्ची ही अशी जागा आहे, जी तुम्हाला निवांतपणा देते. बघा, गच्चीवर वारा सुटलाय. थोडा रसिकपणा दाखवलात तर हा वाराही गार झुळूक वाटेल.  मग जाताय ना ! Stay Home, Stay Safe.

👤 अरुण व्ही. लाडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....